
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
बाबा बंगाली परिसरात अतिक्रमण काढताना महापालिकेच्या पथकावर झालेल्या दगडफेक प्रकरणाच्या निषेधार्थ महापालिका कामगारांनी बुधवारी काम बंद आंदोलन केले. आरोपींवर कारवाई होऊन त्यांना अटक होत नाही, तोपर्यंत काम सुरू करणार नाही, असा पवित्रा महापालिका कामगार युनियनने घेतला आहे. तसेच यापुढे पोलीस बंदोबस्ताशिवाय कोणतीही अतिक्रमण हटाव मोहीम होणार नाही, असा निर्णय यावेळी घेण्यात आल्याचेही युनियनचे अध्यक्ष कॉ. अनंत लोखंडे यांनी सांगितले.
मंगळवारी घडलेल्या घटनेनंतर बुधवारी सकाळी महापालिकेत कामगार युनियनने गेट मीटिंग घेऊन निषेध नोंदवला. यावेळी युनियनचे सचिव आनंदराव वायकर, शहर अभियंता सुरेश इथापे आदींसह विविध विभागांचे प्रमुख, कर्मचारी उपस्थित होते. निषेध सभेनंतर अनेक विभागांनी आपले कामकाज बंद ठेवले. त्यामुळे प्रशासकीय स्तरावरील कामकाज ठप्प झाले होते.
महापालिकेचा कर्मचारी दगडफेकीत जखमी झालेला आहे. मनपा प्रशासनाने पोलीस बंदोबस्त का घेतला नाही, याची चौकशी होणे गरजेचे आहे. दगडफेक प्रकरणातील आरोपींवर कारवाई होऊन त्यांना अटक होत नाही, तोपर्यंत महापालिका कामगार काम सुरू करणार नाहीत. आरोपींना तात्काळ अटक न झाल्यास अत्यावश्यक सेवाही ठप्प केल्या जातील, असा इशारा लोखंडे यांनी यावेळी दिला आहे. दरम्यान, दगडफेक प्रकरणात 10 ते 15 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, अद्याप एकाही आरोपीला बुधवारी उशिरापर्यंत पोलिसांकडून अटक करण्यात आलेली नव्हती.