अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
नगर शहरात रस्ते, रुग्णालय, नाट्यगृह व इतर नावीन्यपूर्ण उपक्रमांसाठी जिल्हा नियोजन मंडळातून देण्यात आलेल्या कामांचा मोठा निधी अखर्चित आहे. सन 2011-12 ते 2021-22 या काळातील 20 कामांचा 23.72 कोटींचा निधी शिल्लक असून, हा निधी परत करण्याचे आदेश राज्य सरकारने महापालिकेला दिले होते. मात्र, आता या निधी खर्चाला 28 फेब्रुवारी 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य शासनाने याबाबत आदेश दिले आहेत.
शहरातील बांधकाम विभागामार्फत प्रलंबित असलेल्या कामांचा आढावा नुकताच महापौर रोहिणी शेंडगे यांनी घेतला. यात जिल्हा नियोजन मंडळातून महापालिकेला मिळालेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना, दलितेतर वस्ती सुधार योजना, जिल्हास्तर नगरोत्थान या योजनेतील 20 कामे अद्यापही प्रलंबित असल्याचे समोर आले. या कामांच्या निधी खर्चाची मुदत मार्च 2023 मध्येच संपली होती. शासनाच्या वित्त आयोगाच्या आदेशानुसार हा अखर्चित निधी परत करावा लागणार होता.
बैठकीत ही बाब समोर आल्यानंतर निधी खर्चाच्या मुदतवाढीसाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश महापौरांनी दिले होते. त्यानुसार मनपाकडून प्रस्तावही सादर करण्यात आला होता. आता शासनाने या निधीच्या खर्चाला मुदत वाढवून दिली आहे. मार्च 2022 पूर्वी वितरीत झालेला व 31 मार्च 2023 रोजी मुदत संपलेला सर्व प्रकारचा निधी 28 फेब्रुवारी 2024 पर्यंत खर्च करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे तूर्तास तरी या निधीवरील गंडांतर टळले आहे. महापालिकेला लवकरात लवकर ही कामे पूर्ण करावी लागणार आहेत.
योजनानिहाय प्रलंबित कामे व अखर्चित निधी मध्ये जिल्हास्तर नगरोत्थान (8 कामे) - 18.26 कोटी, दलितेतर वस्ती (6 कामे) - 1.46 कोटी व अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती (6 कामे) - 3.99 कोटी यांचा समावेश आहे.