मनपाची कर व पाणीपट्टीची थकबाकी 212 कोटींवर

पाच लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्यांवर होणार कारवाई
मनपाची कर व पाणीपट्टीची थकबाकी 212 कोटींवर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर महापालिकेच्या मालमत्ता कर व पाणीपट्टीची थकबाकी 212 कोटींवर पोहचली आहे. सुरूवातीच्या तीन महिन्यांत नियमित कर भरणार्‍या मालमत्ताधारकांनी सवलतीचा लाभ घेत 22.31 कोटींचा कर भरला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून थकबाकीदारांवर कारवाई होत नसल्याने शास्ती व थकबाकीची रक्कम दिवसेंदिवस वाढतच आहे.

चालू आर्थिक वर्षात महापालिकेची 234.16 कोटींची कराची मागणी होती. यात 183.67 कोटींची मागील थकबाकी व 50.49 कोटी रुपये चालू वर्षाची मागणी होती. पहिल्या तीन महिन्यात जून अखेरपर्यंत आयुक्तांनी संकलित करावर 10 टक्के सवलत दिली होती. याचा लाभ घेत 3.05 कोटींची थकबाकी व 19.25 कोटींचा नियमित कर असा एकूण 22.31 कोटींचा कर जमा केला आहे.

211.85 कोटींचा कर अद्यापही थकीत आहे. दरवर्षी नियमित कर भरणारे मालमत्ताधारक पहिल्या तीन महिन्यांत रांगा लावून कर भरतात. मात्र, मोठे थकबाकीदार वर्षानुवर्षे कर भरण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. अशा थकबाकीदारांवर कठोर कारवाई होत नसल्याने वसुली पूर्णपणे कोलमडली आहे.

दरम्यान, मोठ्या थकबाकीदारांवर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पाच लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्यांवर नोटिसा देऊन कारवाई केली जाणार आहे. यासाठी संबंधित प्रभाग अधिकार्‍यांना यादी तयार करून कारवाईच्या सूचना दिल्या असल्याचे उपायुक्त सचिन बांगर यांनी सांगितले.

नोंदी अद्ययावत करून कर आकारणी

नगर शहरातील सर्व मालमत्तांच्या नोंदी अद्ययावत करून कर आकारणीसाठी त्यांचे पुनर्मूल्यांकन करण्याचे आदेश आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी दिले आहेत. मोकळ्या जागांवर अनधिकृतपणे पत्र्याचे शेड मारून उभारण्यात आलेल्या गाळ्यांचेही मूल्यांकन करून त्यांनाही कर आकारणी केली जाणार आहे. दरम्यान, महापालिकेच्या वसुली लिपिकांमार्फतच इमारती, घरांचे व गाळ्यांच्या बांधकामांची तपासणी केली जाणार असल्याची माहिती उपायुक्त सचिन बांगर यांनी दिली.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com