
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे नगरसेवक गणेश कवडे यांचा एकच अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. आज (2 मार्च) होणार्या विशेष सभेत त्यांच्या निवडीची औपचारिक घोषणा होणार आहे.
पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्या अध्यक्षतेखाली आज सभापती पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बुधवारी अखेरची मुदत होती. या मुदतीत महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना नगरसेवक कवडे यांचाच एकमेव अर्ज दाखल झाला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपुष्टात आली आहे. त्यामुळे कवडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. स्थायी समितीच्या आज होणार्या सभेत निवडणूक प्रक्रिया होऊन कवडे यांच्या निवडीची अधिकृत घोषणा होणार आहे.
दरम्यान, सभापती निवडीनंतर आता सभागृह नेताही बदलला जाणार आहे. हे पद राष्ट्रवादी काँग्रेसला दिले जाणार असून, या पदावर विनीत पाऊलबुधे यांची निवड होण्याची शक्यताआहे.