‘स्थायी’च्या सभेत पाणी वितरण व्यवस्थेचे भांडे फुटले

प्रशासनाने दिली अपुरे मनुष्यबळ व यंत्रणेची माहिती || पदाधिकारी व सदस्यही निरूत्तर
‘स्थायी’च्या सभेत पाणी वितरण व्यवस्थेचे भांडे फुटले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहराचा पाणीपुरवठा वारंवार खंडित होतो. वर्षभरात जेमतेम शंभर ते सव्वाशे दिवसच पाणी मिळते. पाणीपुरवठ्याचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत आहे, असा प्रश्‍न उपस्थित करत नगरसेवक गणेश कवडे यांनी विस्कळीत पाणी पुरवठ्यावरून स्थायी समितीच्या सभेत जाब विचारला.

याला जल अभियंता परिमल निकम यांनी उत्तर देताना अपुरे मनुष्यबळ व अपुर्‍या यंत्रणेची माहिती देत अशा परिस्थितीत तुम्ही जाब कसा विचारता असा प्रतिसवाल केला. यावर पदाधिकारी व सदस्यही निरूत्तर झाले. नगर शहराची पाणी वितरण व्यवस्था रामभरोसे असल्याची कबुली महापालिका प्रशासनाने स्थायी समितीच्या सभेत दिली. सभापती कुमार वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी दुपारी स्थायी समितीची सभा पार पडली. यात नगरसेवक कवडे व प्रशांत गायकवाड यांनी प्रभागातील पाण्याच्या समस्येवरून सवाल उपस्थित केला.

धरणात 100 टक्के पाणीसाठा असूनही पाणी मिळत नाही, असा सवाल नागरिक करत आहेत. नगरसेवकांना दररोज नागरिकांच्या या प्रश्नाला सामोरे जावे लागते. आधीच एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. त्यातही पाणीपुरवठा खंडित होतो. वर्षभरात जेमतेम शंभर ते सव्वाशे दिवसच पाणी मिळते. शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे, असे नगरसेवक कवडे यांनी निदर्शनास आणले. जल अभियंता निकम यांनी या संदर्भात माहिती देताना एक ट्रान्सफार्मर बंद असल्याने पाच ऐवजी चार मोटारींवरच पाणी उपसा सुरू असल्याचे सांगितले.

तसेच विभागातील अभियंता सदाशिव रोहकले यांना स्वेच्छा निवृत्ती देण्यात आली. त्यांच्या जागेवर अद्यापही अभियंता नियुक्त झालेला नाही. पाणीपुरवठ्याचे नियोजन, वॉलमनचे नियोजन, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कर्मचारी उपलब्ध नाहीत. अपुरे मनुष्यबळ व अपुरी यंत्रणा असताना आपण जाब कसा विचारू शकता, असा प्रतीसवाल निकम यांनी केला. त्यावर सारेच निरूत्तर झाले. कवडे यांनी सभापती वाकळे यांचे याकडे लक्ष वेधत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली. सभापती वाकळे यांनी पाणीपुरवठा विभागाच्या प्रस्तावांवर तातडीने निर्णय घ्यावा व त्यांना कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, असे आदेश आस्थापना विभागाला दिले.

सभेच्या सुरूवातीलाच नगरसेवक मुदस्सर शेख यांनी जुन्या आरटीओ कार्यालयाजवळ तसेच कोठला चौक परिसरात महामार्गाच्या कडेला टाकल्या जाणार्‍या निमल वेस्टचा मुद्दा उपस्थित केला. मागील सभेत कारवाईचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले होते, त्याचे काय झाले, असा सवाल त्यांनी केला. उपायुक्त यशवंत डांगे यांनी यावर माहिती देताना अरणगाव चौकात हिंदुराष्ट्र सेनेकडून गाड्या अडविण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रश्न निर्माण झाला होता. आता संकलन सुरू झाले, असे सांगितले. मात्र, अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी निमल वेस्ट आणून टाकले जात आहे. बोल्हेगाव परिसरातही अशीच परिस्थिती आहे, असे सभापती वाकळे यांनी निदर्शनास आणले.

अतिक्रमणावर कारवाई करण्याचे आदेश

शहरात 12 मीटरचे रस्ते चार मीटर झाले आहेत, असा आरोप करत अतिक्रमण विभाग काय करतो, असा सवाल सभापती वाकळे व विनित पाऊबुध्दे यांनी उपस्थित केला. या अतिक्रमणांकडे किती दिवस दुर्लक्ष करणार, असा सवाल करत इमारतीसमोरील पत्र्याचे शेड, दुकानासमोरील जाळ्या तसेच रस्त्यांवर बसणारे विक्रेते यांच्यावर कारवाई करावी, असे आदेश वाकळे यांनी दिले. तसेच मनपाच्या चारही प्रभाग अधिकार्‍यांनी अतिक्रमणासंदर्भात खुप तक्रारी आहेत. परंतु मनुष्यबळ नसल्याचे सांगितले. त्यावर नियोजन करून दर आठवड्याला प्रभाग समिती कार्यालयास गाडी व कर्मचारी द्यावेत व कारवाई करावी, अशा सूचना देण्यात आल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com