
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
महापालिकेच्या स्थायी समितीची सभा आज (शुक्रवार) बोलविण्यात आली आहे. रस्त्याचे काँक्रिटीकरण, डांबरीकरण, आरसीसी पाईप गटार, पाण्याच्या टाकीला संरक्षक भिंत बांधणे, ओपन स्पेस विकसित करणे यासह विविध विभागात कंत्राटी व मानधनावर कर्मचारी नियुक्त करणे आदी विषयांवर सभेत निर्णय होणार आहे.
सभापती कुमार वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11.30 वाजता ही सभा होणार आहे. बाळासाहेब देशपांडे दवाखान्यात डॉक्टर, नर्सची मानधनावर नियुक्ती करणे, रक्तपेढीमध्ये लॅब टेक्निशियनची नियुक्ती, पाणीपुरवठा विभागात मानधनावर अभियंता नियुक्त करणे, केदारवस्ती येथे पाण्याची टाकी, ओपनस्पेसला संरक्षक भिंत बांधणे व ओपन स्पेस विकसित करणे, प्रभाग 15 मधील महात्मा फुले वसाहत ते मेन लाईनपर्यंत 600 एमएम आरसीसी पाईप गटार करणे, काटवन खंडोबा रोड ते महात्मा फुले वसाहत ते रात्र निवारा केंद्रापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे, प्रभाग 17 मधील रस्त्यांचे डांबरीकरण, आयुर्वेद कॉलेज चौक ते स्वस्तिक चौक गटार व्यवस्थेसह रस्ता काँक्रिटीकरण करणे आदी प्रस्ताव सभेसमोर ठेवण्यात आले आहेत.