ओढ्या-नाल्यांतील पाईप कायम

मनपाची मोहीम कागदावर || उद्या लोकायुक्तांसमोर सुनावणी
ओढ्या-नाल्यांतील पाईप कायम

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

ओढ्या-नाल्यांमध्ये टाकलेले सिमेंटचे पाईप 3 ऑक्टोबर पासून काढण्याचे महापालिकेचे आश्वासन व नियोजन अजून कागदावरच आहे. याप्रकरणी येत्या मंगळवारी 10 ऑक्टोबरला लोकायुक्तांसमोर सुनावणी होणार असल्याने यावेळी तक्रारदार नागरिक कृती मंचाचे अध्यक्ष शशिकांत चेंगडे वस्तुस्थिती मांडणार आहेत. त्यामुळे या सुनावणीत काय होते, याची उत्सुकता आहे.

चेंगडे यांच्या लोकायुक्तांकडे तक्रारीवर मागील 7 ऑगस्टला सुनावणी झाली, त्यावेळी महापालिकेने कारवाईसाठी दोन महिन्यांची मुदत मागून घेतली होती. या मुदतीत महापालिकेने ओढ्या- नाल्यालगतच्या 118 मालमत्ताधारकांना नोटिसा देऊन त्यांच्या कागदपत्रांची तपासणी केली. यापैकी काही प्लॉटमध्ये विकास आराखड्यात ओढे-नाले नाहीत, परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी ओढे-नाले आढळून येत असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष व जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी नुकत्याच 27 सप्टेंबर रोजी घेतलेल्या आढावा बैठकीत गणेशोत्सव संपल्यावर तीन ऑक्टोबरपासून नैसर्गिक ओढे व नाले यांच्यावरील अतिक्रमण काढण्याची कार्यवाही सुरू करणार असल्याचे महापालिकेने सांगितले आहे. परंतु तीन ऑक्टोबर तारीख उलटून चार-पाच दिवस झाले तरी मनपाची ही कारवाई अजूनही सुरू झालेली नाही, असे तक्रारदार चंगेडे यांचे म्हणणे आहे.

सीना नदीतील अतिक्रमणे काढा

जिल्हाधिकार्‍यांनी घेतलेल्या बैठकीत महापालिका हद्दीतून वाहणारे ओढे-नाले तसेच सीना नदीच्या हद्द निश्चित झालेल्या भागातील अतिक्रमणे काढण्याची कार्यवाही ऑक्टोबर महिन्यात करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता महापालिकेला या महिन्यात ओढ्या-नाल्यांसह सीना नदी पात्रातील अतिक्रमणेही हटवावी लागणार आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com