मनपाच्या बुरूडगाव येथील कचरा डेपोला मोठी आग

18 तासांनंतर आगीची धग कायम || कोट्यवधींची यंत्रसामग्री बचावली
मनपाच्या बुरूडगाव येथील कचरा डेपोला मोठी आग

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महापालिकेच्या बुरूडगाव येथील कचरा डेपोमध्ये लँडफिल साईटवरील हजारो टन कचर्‍याला सोमवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास आग लागली. नगर महापालिकेसह एमआयडीसी व राहुरी नगर पालिकेच्या अग्निशामक बंबांनी आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तब्बल अठरा तास उलटल्यानंतरही आग पूर्णपणे विझलेली नव्हती. आग नियंत्रणात असली तरी रात्री उशिरापर्यंत आगीची धग कायम होती. दरम्यान, या आगीत मनपाचा खतनिर्मिती प्रकल्पातील कोट्यवधी रुपयांची यंत्रसामग्री थोडक्यात बचावली.

पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास खतनिर्मिती प्रकल्पाशेजारी असलेल्या लँडफिल साईटवरील कचर्‍याने पेट घेतला. अवघ्या काही मिनिटांतच संपूर्ण कचर्‍याने पेट घेतला व आग भडकली. मनपाच्या अग्निशामक दलाला माहिती मिळताच दोन गाड्या रवाना झाल्या. आगीचे स्वरूप मोठे असल्याने एमआयडीसी व राहुरी नगर पालिकेच्या गाड्या मदतीला बोलावण्यात आल्या.

पहाटेपर्यंत या चार गाड्यांनी प्रत्येकी पाच ते सहा खेपा मारत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. पहाटेपर्यंत काही प्रमाणात आग आटोक्यात आली. मात्र, वार्‍यामुळे आग वारंवार पुन्हा भडकत आहे. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. आणखी दोन ते तीन दिवस या आगीची धग कायम राहू शकते, असे सांगण्यात आले.

आगीत खतनिर्मिती प्रकल्प थोडक्यात बचावला. मात्र, या आगीमुळे कचरा डेपो परिसरातील वीज वाहक तारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे खतनिर्मिती प्रकल्पाचा विद्युतपुरवठा खंडित झाला आहे. वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतरच खतनिर्मिती प्रकल्प पुन्हा सुरू केला जाणार आहे.

लँडफिल साईटवर मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे. त्याचे बायोमायनिंग न झाल्याने हा कचरा तसाच पडून आहे. त्याशेजारीच विलगीकरण झालेला व प्रक्रिया न झालेला कचरा मोठ्या प्रमाणात साचला आहे. खतनिर्मिती प्रकल्प सुरू असतानाही हा कचरा कसा साचला, असा सवाल उपस्थित होत आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com