
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
शासनाकडून राज्यभरात ‘माझी वसुंधरा अभियान’ राबविले जात आहे. या अंतर्गत अहमदनगर शहरात अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम महापालिकेने हाती घेतले आहेत. याचाच एक भाग म्हणून शहरात प्रथमच इलेक्ट्रीक व्हेईकल चार्जिंग स्टेशन उभारणीचे काम सुरू झाले आहे. महापालिका प्रशासनाच्या पुढाकारातून मुख्य कार्यालयाबाहेर व वसंत टेकडीजवळ दोन ठिकाणी या चार्जिंग स्टेशनची उभारणी होणार आहे.
पर्यावरणपूरक ई-बाईकच्या वापरासाठी जनजागृती केली जात असून, त्याची सुरूवात मनपा कर्मचार्यांना ई-बाईक खरेदीसाठी प्रोत्साहन देऊन करण्यात आली आहे. इंधन दरवाढीमुळे नागरिकांचाही इलेक्ट्रीक वाहन खरेदीकडे ओढा वाढला आहे. त्यामुळे मनपाने आता इलेक्ट्रीक व्हेईकल चार्जिंग स्टेशन उभारणीसाठी पुढाकार घेतला आहे. मनपा प्रशासन व विद्युत विभागाच्या प्रयत्नातून दोन ठिकाणी काम सुरू झाले आहे. टाटा ऑटोकॉम्प सिस्टीम या कंपनीमार्फत हे स्टेशन चालविले जाणार आहेत. काम पूर्ण झाल्यानंतर कंपनीकडून दर निश्चीत केले जाणार असल्याचे मनपाकडून सांगण्यात आले.