
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
महापालिकेच्यावतीने मंगळवारी शहराच्या मध्यवर्ती भागात गंजबाजार येथे अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. तसेच गंजबाजार भाजी मार्केटमधील मनपाच्या मीटर मधून घेण्यात आलेले बेकायदेशीर वीज कनेक्शन तोडण्यात आले. आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्यासह प्रमुख अधिकार्यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान सराफ बाजार परिसरातील बंद असलेल्या पाणपोईचे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले.
गंजबाजार फळ मार्केट रस्त्यावर लावलेल्या ताडपत्री, प्लास्टिक कागद, झेंडे, जाहिरातीचे लहान लहान फलक, हातगाड्या, होर्डिंग्ज व इतर अतिक्रमणे महापालिकेच्या पथकाने कारवाई करून हटवली. आयुक्त डॉ. जावळे व उपमहापौर गणेश भोसले यांनी पाहणी केली. अतिक्रमण निर्मूलन विभाग प्रमुख रोहिदास सातपुते, क्षेत्रीय अधिकारी इंगळे, अर्जुन जाधव, रिजवान शेख यांच्यासह पथकातील कर्मचार्यांनी ही कारवाई केली. कारवाईत सराफ बाजार परिसरात चौकाच्या मधोमध असलेली जुनी पाणपोई महापालिकेने जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त केली.
त्यानंतर गंजबाजार भाजी मार्केट परिसरातील महापालिकेच्या विजेच्या मीटरमधून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे वीज कनेक्शन घेऊन वीज चोरी होत असल्याचे पाहणीत समोर आले. विद्युत विभागाच्या कर्मचार्यांनी सदर बेकायदेशीर कनेक्शन तोडले. सुमारे दहा ते पंधरा छोट्या मोठ्या व्यावसायिकांकडून ही वीज चोरी सुरू होती, असे सांगितले जात आहे.