नालेसफाईची 20 ठिकाणची कामे प्रलंबित

येत्या आठवड्यात पूर्ण करण्याचे नियोजन
नालेसफाईची 20 ठिकाणची कामे प्रलंबित

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर शहरात पावसाने हजेरी लावली, तरी अद्याप नालेसफाईची कामे सुरूच आहेत. महापालिकेने 19 ओढे व नाल्यांच्या सफाईसाठी 48 टप्पे करून काम सुरू केले आहे. मात्र, अद्यापही 48 पैकी 20 ठिकाणची कामे प्रलंबित आहेत. मागील काही दिवसात 28 ठिकाणी कामे पूर्ण झाली असून, उर्वरीत कामे येत्या आठवड्यात पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

महापालिका प्रशासनाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागामार्फत साफसफाईचे काम सुरू आहे. 20 ठिकाणी कामे प्रलंबित असून त्यापैकी पाच ठिकाणी सध्या जेसीबी, पोकलेन मशीनद्वारे काम सुरू आहे. काही ठिकाणी मोठे मशीन जाण्यास जागा नसल्याने छोटे मशीन मागवून कामे केली जात आहेत.

येत्या आठवडाभरात ही कामे पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, नाल्यातून काढण्यात आलेला गाळ उचलून नेण्याकडे दुर्लक्ष होत आहे. अनेक ठिकाणी नाल्याच्या कडेलाच गाळ टाकला जातो. मोठा पाऊस झाल्यास हा गाळ पुन्हा नाल्यात जात आहे. दरम्यान, ओढे व नाल्यांजवळ पडलेला कचरा उचलण्यात आलेला नाही. पावसामुळे हा कचरा कुजून दुर्गंधी पसरते. याबाबत ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.

शहरात अनेक ठिकाणी ओढे व नाले पाईप टाकून बुजवण्यात आले आहेत. काही ठिकाणी प्रवाह वळवण्यात आले आहेत. याबाबत सर्वेक्षण होऊनही ओढे व नाल्यांचे बंदिस्त प्रवाह मोकळे करण्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com