
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
महापालिकेच्या शहर अभियंता पदाचा कार्यभार सुरेश इथापे यांच्याकडून काढून घेण्यात आला आहे. नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता कक्षामध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, अभियंता श्रीकांत निंबाळकर यांच्याकडे पुढील आदेशापर्यंत शहर अभियंता पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.
शुक्रवारी सायंकाळी उशिरा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी हे आदेश काढले होते. सोमवारी त्याची अंमलबजावणी करण्यात आली. अभियंता इथापे यांची आचारसंहिता कक्षात नियुक्ती करण्यात आली असून तेथील काम पूर्ण क्षमतेने होणे आवश्यक असल्याने निवडणूक प्रक्रीया पूर्ण होइपर्यंत पूर्णवेळ कामकाज पहावे, असे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.
या काळात शहरातील सुरू असलेल्या विकास कामांसह दैनंदिन कामकाजावर नियंत्रण ठेवणे शक्य नसल्याने त्यांच्याकडील शहर अभियंता या पदाचा कार्यभार तात्पुरत्या स्वरूपात निंबाळकर यांच्याकडे सोपविण्यात येत असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, सोमवारी सकाळी या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आल्यावर अभियंता निंबाळकर यांनी शहर अभियंता पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.