दफनभूमीसाठी 32 कोटींची बेकायदेशीर जागा खरेदी थांबवा

जागरूक नागरिक मंचाची शासनाकडे याचिका
दफनभूमीसाठी 32 कोटींची बेकायदेशीर जागा खरेदी थांबवा

अहमदनगर |प्रतिनिधी|Ahmednagar

महापालिकेद्वारे दफनभूमी-स्मशानभूमीसाठी प्रभाग क्रमांक एकमध्ये जागा आरक्षित असतांना ती सोडून येथेच दुसरी जागा 32 कोटी रुपये खर्चून घेण्याचा निर्णय थांबवण्याची मागणी येथील जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष डॉ. सुहास मुळे यांनी शासनाकडे याचिका दाखल करून केली आहे.

यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी मनपाच्या महासभेत मंजूर झालेला जागा खरेदीचा ठराव विखंडीत करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. डॉ. मुळे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री, नगरविकास विभागाचे मुख्य सचिव, औरंगाबाद खंडपीठाचे मुख्य न्यायाधीश तसेच नगरचे जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांकडे ही याचिका दाखल केली आहे.

महापालिकेमध्ये 25 नोव्हेंबर रोजी झालेल्या महासभेमध्ये सावेडी-बोल्हेगाव उपनगरातील स्मशानभूमीसाठी मंजूर विकास योजनेतील आरक्षण क्रमांक 58 व 59 याबाबतच्या विषयाचा उल्लेख करून, ती जागा अधिग्रहित करण्याचा पूर्ण अधिकार हा मनपा आणि शासनाला असूनही तो हेतुपुरस्सर न बजावता, संगनमताने पर्यायी जागा निश्चित करून 32 कोटी रुपये एवढ्या प्रचंड अवाजवी भावाने जागा तात्काळ खरेदी करण्यासाठी जो बेकायदेशीर प्रस्ताव ठेवण्यात आला व त्याला मनपाचे 68 पैकी अवघे 15 नगरसेवक उपस्थित असताना आणि सात नगरसेवकांचा लेखी विरोध असताना लगेचच मंजुरीही देण्यात आली, त्याबाबत तात्काळ चौकशी करून हा ठराव मनपा अ‍ॅक्ट 451 मधील तरतुदीनुसार विखंडित करण्याची मागणी त्यांच्याकडे केली आहे.

लोकप्रतिनिधी कोण, ते शोधा

महापालिकेमध्ये दिवसा ढवळ्या धनदांडग्या लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन दंडेलशाही करून बेकादेशीर ठराव मंजूर करून जर आपण सगळे भाऊ भाऊ.. मिळून सगळी मनपा खाऊ अशी प्रचंड नफेखोरी होत असेल तर यामध्ये शासनाने तत्काळ लक्ष घालून 451 मधील तरतुदीनुसार हा ठराव तत्काळ विखंडित करावा, त्याचप्रमाणे या प्रकाराची सखोल चौकशी करून ही जागा कुठल्या लोकप्रतिनिधीशी संबंधित आहे ? तसेच या लोकप्रतिनिधींच्या बाबत वा त्याच्या नातेवाईकांबाबत यापूर्वी देखील मनपाकडून असेच बेकायदेशीर जागा खरेदीचे प्रकार घडले आहेत की नाही, याची चौकशी करून संबंधितांना अपात्र ठरवून ताबडतोब बडतर्फ करून निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही यात करण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com