विकास भारमधील 15 कोटींच्या खर्चाचा हिशोब अनुत्तरीत

मनपा बजेट शिफारशींसह स्थायी महासभेला सादर करणार
विकास भारमधील 15 कोटींच्या खर्चाचा हिशोब अनुत्तरीत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महापालिकेच्या नगर रचना विभागाकडे विकास भारापोटी जमा झालेल्या 15 कोटींच्या रकमेतून काय खर्च झाला याचा हिशेब गुरूवारी (16 मार्च) अखेर अनुत्तरीतच राहिला. आमच्याकडे फक्त पैसे जमा करण्याचे काम आहे, त्या पैशांचा खर्च करण्याचे अधिकार लेखा विभागाला आहेत, असे स्पष्टीकरण मनपा नगररचना विभागाचे सहायक संचालक राम चारठणकर यांनी दिले व आमच्याकडे फक्त 6 कोटी 86 लाख रुपये जमा आहेत, असे स्पष्टीकरण लेखाधिकारी शैलेश मोरे यांनी दिले.

दोन वरिष्ठ अधिकार्‍यांच्या या स्पष्टीकरणातून मनपा विकास भारमध्ये खरेच 15 कोटी होते की नाही, असाच संभ्रम निर्माण झाला व त्यामुळे या पैशांतून भूसंपादन व अन्य काही खर्च झाला की नाही, याचे स्पष्टीकरणही अनुत्तरीत राहिले. दरम्यान, मनपाच्या यंदाच्या बजेटवरील चर्चा स्थायी समितीने पूर्ण केली व आता शिफारशींसह त्यांच्याकडून हे बजेट महासभेला अंतिम मंजुरीसाठी सादर होणार आहे.

मनपाचे यंदाचे 1240 कोटींचे बजेट आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी तयार करून ते स्थायी समितीकडे शिफारशींसाठी पाठवले होते. या समितीने दोन दिवस या बजेटमधील उत्पन्न व खर्चाच्या बाजूंची सविस्तर माहिती घेतली. सभापती गणेश कवडेंसह विरोधी पक्ष नेते संपत बारस्कर, सभागृहनेते विनित पाऊलबुद्धेसह अन्य सदस्यांनी यात भाग घेत विविध सूचना केल्या. उत्पन्न व खर्चाच्या बाजूस विविध सूचना सदस्यांनी केल्या व या एकत्रित सूचनांनुसार आवश्यक शिफारशींसह हे बजेट लवकरच महासभेस सादर होणार आहे.

स्थायी समिती सभापती कवडेंनी आतापर्यंतच्या पायंड्यानुसार पदाधिकारी शहर विकास निधीसाठी कोट्यवधीची तरतूद केली. मात्र, हे करताना त्यांनी स्थायी समिती सभापती म्हणून स्वतःच्या विकासनिधीत चक्क 50 लाखांची कपात केली, पण त्याचवेळी विरोधी पक्ष नेत्यांसाठीच्या निधीत तब्बल 35 लाखांनी वाढ केली. या निधीअंतर्गत त्यांनी महापौरांसाठी अडीच कोटी, उपमहापौरांसाठी 1 कोटी, स्थायी सभापतींसाठी 1 कोटी ऐवजी 50 लाख, महिला-बालकल्याण समितीच्या सभापतीसाठी 15 लाख व उपसभापतीसाठी 10 लाख, विरोधी पक्ष नेत्यासाठी 15 लाखांऐवजी 50 लाख व सभागृहनेत्यासाठी 50 लाख रुपयांच्या विकास निधीची तरतूद केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com