मनपाकडून मालमत्ता जप्त करण्याचा धडाका

आयुक्तांचे कठोर निर्देश || वसुलीसाठी आक्रमक भूमिका
मनपाकडून मालमत्ता जप्त करण्याचा धडाका

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या थकबाकी वसुलीसाठी महापालिका प्रशासनाने आक्रमक कारवाईला सुरूवात केली आहे. आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी थकबाकीदारांवर कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर चारही प्रभाग समिती कार्यालयाकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. सोमवारी व मंगळवारी दिवसभरात महापालिकेने 11 थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त केल्या, तर 12 थकबाकीदारांचे नळ कनेक्शन तोडले आहेत.

माळीवाडा प्रभाग कार्यालयाने सोमवारी मे. आयडीया सेल्युलर लिमिटेड - जयंत नारायण देशमुख (रा. कोर्ट गल्ली) यांच्याकडे असलेल्या थकबाकीपोटी मालमत्ता जप्त केली आहे. रमाकांत श्रीकृष्ण निघोजकर (भो. असेंड टेलिकॉम इन्फ्रा, रा. विळदकर गल्ली, माळीवाडा) यांच्याकडे 1.71 लाख, शेख नसीर हुसेन व इतर (भो. विओम इन्फ्रा) यांच्याकडे 21.46 लाख व के. पी. बोथरा (रा. कोर्ट रोड/गुजर गल्ली) यांच्याकडे असलेल्या 3.35 लाखांच्या थकबाकीपोटी मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत.

तसेच मंगळवारी भारत संचार निगम (एस. एम. खाजगीवाले, रा. ख्रिस्त गल्ली) यांच्याकडील 2.09 लाख, सेंच्युरी इन्फ्रा टेली लि. (एस. एम. खाजगीवाले, रा. ख्रिस्त गल्ली) यांच्याकडील 9.39 लाख, सेंच्युरी इन्फ्रा टेली लि. (काशीनाथ सावळेराम रघुनाथ दारुणकर रा. तेलीखुंट) यांच्याकडील 3.33 लाख रुपयांच्या थकबाकी पोटी त्यांच्या मालमत्ता सील केल्या आहेत.

बुरूडगाव प्रभाग कार्यालयाने सोमवारी नगर-पुणे रोड येथील मटन मार्केटमधील सात गाळ्यांच्या 2.02 लाखांच्या थकबाकीपोटी मालमत्ता सील केली. तसेच रंगोली चौक येथील साईप्रसाद फर्निचर मॉल 2.22 लाखांच्या थकबाकीपोटी सील केला. भूषणनगर येथील थकबाकीदाराच्या घरासमोर ढोलकी वाजवून त्यांचे दोन नळ कनेक्शन तोडण्यात आले. मंगळवारी कायनेटिक चौक येथील मालमत्ता 16.99 लाख रुपयांच्या थकबाकीपोटी सील केली.

सावेडी प्रभाग कार्यालयाने सोमवारी तीन मालमत्ता धारकांचे नळ कनेक्शन तोडले. कटारिया यांच्याकडे असलेल्या 1.26 लाखांच्या थकबाकीपोटी त्यांची मालमत्ता सील केली. मंगळवारी आठ थकबाकीदारांचे नळ कनेक्शन तोडून त्यांचे पाणी बंद केले आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com