
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
मालमत्ता कराच्या थकबाकीपोटी महापालिकेकडून जप्ती कारवाईला वेग देण्यात आला आहे. शहरातील माळीवाडा व बुरूडगाव प्रभाग कार्यालयाकडून लाखो रुपयांच्या थकबाकीपोटी दोन मालमत्ता सील करून जप्त केले आहेत.
बुरूडगाव प्रभाग समिती अंतर्गत मालमत्ताधारक राजेश कुंदनमल उपाध्ये यांचा कुंदन कॉम्प्लेक्स (सक्कर चौक) येथील जिमचा गाळा सील करून जप्त करण्यात आला आहे. त्यांच्याकडे मालमत्ता कराची तीन लाख 50 हजार 268 रुपयांची थकबाकी आहे. प्रभाग अधिकारी नानासाहेब गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली कर निरीक्षक व्ही. एन. बालानी, वसुली लिपीक राजेंद्र म्हस्के, हबीब शेख, बाळासाहेब सुपेकर यांनी ही कारवाई केली.
माळीवाडा प्रभाग समिती अंतर्गत मालमत्ताधारक अमेरिकन मिशन मुलांचे बोर्डींग या मिळकतीच्या चार लाख 67 हजार 580 रुपयांच्या थकबाकीपोटी त्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. प्रभाग अधिकारी आर. बी. कोतकर, कर निरीक्षक एस. टी. गोडळकर, वसुली लिपीक एस. डी. धामणे, एस. एम. साबळे, ए. एन. गोयर, पी. ए. इंगळे यांनी ही कारवाई केली. नागरिकांनी थकीत कराचा भरणा करून जप्तीसारखी कटू कारवाई टाळावी, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.