मनपा शहरातील 36 ठिकाणांची नावे बदलणार

जातींची ओळख मिटणार : नागरिकांना केले आवाहन
मनपा शहरातील 36 ठिकाणांची नावे बदलणार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

ब्राह्मण गल्ली...खाटीक गल्ली...ख्रिश्चन कॉलनी...वैदूवाडी...अशी जात समूहाची ओळख दाखवणार्‍या नगरमधील प्रसिद्ध ठिकाणांना आता नवी नावांची ओळख मिळणार आहे. जातीच्या नावाने असलेली याठिकाणांची ओळख मिटवून त्यांना नव्या नावाने आता ओळखले जाणार आहे.अर्थात, ही प्रक्रिया आता सुरू झाली आहे. महापालिकेने शहरातील अशी जातीची ओळख सांगणारी 36 ठिकाणे शोधली असून त्यांचे नवे नामकरण करण्याबाबत नगरकरांना आवाहन केले आहे. अर्थात नगरकरांना महापुरुषांची वा लोकशाही मूल्यांशी निगडीत नावे किंवा महाराष्ट्रातील भौगोलिक रचनेनुसार म्हणजे पर्वत, नद्या,पक्षी आदींच्या अनुषंगाने नावे सुचवण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली गेली आहे.

जात नाही...ती जात...किंवा नावात काय असते...असे मुद्दे नेहमी समाजमनात असतात व सार्वजनिक ठिकाणीही चर्चेत असतात. पण, व्यवसाय वा सुरक्षिततेसह विविध कारणांनी अनेक ठिकाणी विविध जातसमूह पूर्वापारपासून वसले आहेत.त्यानंतर संबंधित परिसराचा जसा विकास होत गेला, तसा तो परिसर तेथे वस्ती करून राहणार्‍या मोठ्या जात समूहांच्या नावाने ओळखला जाऊ लागला आहे. नगरमध्ये अशीब्राह्मण गल्ली, भिल्ल वस्ती, शिंपी गल्ली, हरिजन वस्ती, गवळीवाडा, माळीवाडा, कसाईगल्ली अशी अनेक जात समूहाने ओळखले जाणारे परिसर आहेत.

अर्थात हे नगरमध्येच आहेत,असे नाही तर राज्यभरात असे अनेकविध जात समूहांच्या नावाने ओळखले जाणारे भाग आहेत. या सर्व भागांचे नवे नामकरण करण्याचे राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार असताना ठरवले गेले होते. डिसेंबर 2020 मधील या निर्णयाची अंमलबजावणी तब्बल दोन वर्षांनी नगर शहरात होत आहे. नगरमधील 36 ठिकाणांची नावे या मोहिमेत बदलली जाणार आहेत. त्याची प्रक्रिया आता महापालिकेने सुरू केली आहे. नागरिकांना आता नवी नावे सुचवण्याचे आवाहन केले गेले आहे.

ही नावे आता बदलणार

ब्राह्मण कारंजा (ईदगाह मैदानाजवळ), ब्राह्मण गल्ली (माळीवाडा), भिल्लवस्ती (सावेडी नाका), वैदूवाडी (सावेडी), शिंपी गल्ली (सहकार नगर), तेलीखुंट, मोचीगल्ली (तोफखाना), मोचीगल्ली (कापडबाजार), कुंभारगल्ली (नालेगाव), खाटीक गल्ली (अंबिका महिला बँकेजवळ, पांचपीर चावडी), हरिजन वस्ती (सिद्धार्थनगर), बौद्धवस्ती (सिद्धार्थनगर), हरिजन वस्ती (माळीवाडा), ढोरवस्ती (रामकृष्ण शाळेजवळ, भवानीनगर), हरिजन वस्ती (केडगाव), गवळीवा़ड़ा (सिव्हील हॉस्पिटलजवळ), माळीवाडा, कसाईगल्ली (नगरतालुका पोलिस स्टेशन शेजारी, झेंडीगेट), खाटीक गल्ली (माळीवाडाफुलसौंदर चौक), वडारवस्ती (केडगाव), काळू बागवान गल्ली, ख्रिश्चन कॉलनी (तारकपूरजवळ), सिंधी कॉलनी (तारकपूरजवळ), वाणीनगर(पाईपलाईन रोड), धनगर गल्ली (लक्ष्मीबाई कारंजाजवळ), वंजार गल्ली, पिंजार गल्ली, ढोरवस्ती (बालिकाश्रम शाळेजवळ), कुंभारगल्ली(बागडपट्टी), परदेशी गल्ली, खिस्त गल्ली, मिसगर चाळ, बुरुडगल्ली, सिंधी कॉलनी (भुतकरवाडीजवळ), मराठानगर (केडगाव) व गुजरगल्ली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com