
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
तु बस जागोजागी का थांबत नाही, असे म्हणत महापालिकेच्या सीटी बसवरील वाहकाला तरूणाने शिवीगाळ, मारहाण केल्याची घटना रविवारी सायंकाळी पत्रकार चौकात घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. सचिन नवनाथ भांड (वय 25 रा. धोत्रे बुद्रुक ता. पारनेर) असे मारहाण झालेल्या वाहकाचे नाव आहे. त्यांनी यासंदर्भात पोलिसांत फिर्याद दिली आहे.
आकाश पंढरीनाथ केदारे (वय 26 रा. सिध्दार्थनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे. फिर्यादी सचिन भांड रविवारी सकाळी वाहक म्हणून ड्यूटीवर हजर झाले होते. त्यांच्यासोबत चालक म्हणून अक्षय दीपक म्हेत्रे कर्तव्य करीता हजर होते. ते दिवसभर त्यांच्या ताब्यातील सीटी बसने (एमएच 16 सीसी 6925) माळीवाडा ते निर्मलनगर अशी प्रवासी वाहतुक करीत होते. सायंकाळी बस निर्मलनगरकडून माळीवाडा येथे जात असताना सावेडी उपनगरातील भिस्तबाग चौक येथे काही इसम बसमध्ये बसले होते. बस झोपटी कॅन्टींगजवळ आली असता एक तरूण बसमध्ये बसला व तो वाहक भांड यांना शिवीगाळ करून लागला.
तेवढ्यात बस पत्रकार चौकात आली असता शिवीगाळ करणार्या तरूणाने, तू बस जागोजागी का थांबत नाही, असे म्हणून हातातील स्टिलच्या डब्याने फिर्यादीच्या डोक्यात, पाठीत मारहाण करून जखमी केले. मारहाणीत फिर्यादीकडील तिकीट काढण्याचे मशीन फुटले असून तिकीटाचे एक हजार 500 रूपये गहाळ झाले आहेत. चालक अक्षय म्हेत्रे यांनी बस शहर वाहतुक शाखेच्या कार्यालयाजवळ थांबविली. तेथे वाहतुक पोलिसांनी हा वाद मिटविला.
बस तोफखाना पोलीस ठाण्यात आणली असता मारहाण करणार्या तरूणाने त्याचे नाव आकाश पंढरीनाथ केदारे (वय 26 रा. सिध्दार्थनगर) असे सांगितले. त्याच्याविरूध्द सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.