
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
नगर शहराचा पाणी प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी केंद्र शासनाच्या ‘अमृत’ अभियानातून पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण करण्यात आले. मात्र, या उपलब्ध पाण्यातून नगरकरांना पाणी देण्यासाठी महापालिका प्रशासन व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्याचे मंगळवारी समोर आले. मुळा धरणातून महापालिका किती पाणी उपसा करते व वसंत टेकडीपर्यंत नेमके किती पाणी येते, याची कोणतीही ठोस आकडेवारीच अधिकार्यांकडे उपलब्ध नाही.
त्यामुळे नियोजन करायचे कसे, असा सवाल नगरसेवकांनी उपस्थित केला. यासंदर्भात मंगळवारी आयोजित केलेल्या बैठकीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे प्रमुख अधिकारी अनुपस्थित राहिल्याने कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही. त्यामुळे बैठक स्थगित करण्यात आली. आज (बुधवारी) पुन्हा बैठक होणार असून या बैठकीत अधिकारी उपस्थित न राहिल्यास त्यांना काळे फासण्याचा इशारा खुद्द महापौरांसह नगरसेवकांनी दिला आहे.
नगर शहराला दररोज पाणीपुरवठा करण्याच्यादृष्टीने नियोजनासाठी महापौर रोहिणी शेंडगे यांनी काल बैठक आयोजित केली होती. यावेळी स्थायी समिती सभापती गणेश कवडे, नगरसेवक शाम नळकांडे, सचिन शिंदे, निखिल वारे, संजय शेंडगे, उपायुक्त श्रीनिवास कुरे आदी उपस्थित होते. फेज टू व अमृत पाणी योजनेच्या कामाची जबाबदारी असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता जय बिवाल हे उपस्थित होते. मात्र, त्यांच्याकडे संपूर्ण माहिती व नियोजन कसे करणार याची माहिती उपलब्ध नव्हती. इतर अधिकारी ऑनलाईन बैठकीत असल्याचे कारण देऊन गैरहजर होते. त्यामुळे नगरसेवकांनी संताप व्यक्त केला व बैठक स्थगित करण्यात आली.
बैठकीत निकम यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विरोधात तक्रारींचा पाढा वाचला. गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी बैठकांना येत नाहीत. योजनेच्या कामावर कोणतेही लक्ष देत नाहीत. महापालिकेने स्वतः यात लक्ष घालून वसंत टेकडीपर्यंत पाणी आणले व चाचणी सुरू केली. या प्रक्रियेतही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी कुठेही उपलब्ध नव्हते. वारंवार सूचना देऊनही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकार्यांकडून प्रतिसाद मिळत नाही, असे निकम यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंता बिवाल यांनी माहिती देताना महापालिका दररोज 105 एमएलडी पाणी मुळा धरणातून उपसते, असे सांगितले. विळदपर्यंत 102 एमएलडी पाणी पोहोचते, अशी नोंद आहे. मात्र वसंत टेकडी पर्यंत अवघे 63 एमएलडी पाणी पोहोचते. उर्वरित पाणी केडगाव व नागापूरसाठी दिले जाते. मात्र, त्याचे नियोजन कसे केले जाते, किती पाणी दिले जाते, त्यातील वसंत टेकडीला येते का, याची कोणतीही माहिती व आकडेवारी उपलब्ध नसल्याचे बैठकीत समोर आले.
बैठकीत महापौर शेंडगे, सभापती कवडे, नगरसेवक नळकांडे, वारे, शिंदे यांनी दररोज किती पाणी उपसा होतो, वसंत टेकडी पर्यंत किती पाणी येते, याची माहिती मागितली. अद्याप मीटर का बसवण्यात आले नाहीत, याचाही जाब विचारला. मात्र, कोणतेच ठोस उत्तर मिळू शकले नाही. कोणतेच नियोजन नसल्याने नगरकरांना अमृतचे उपलब्ध झालेले पाणी मिळण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागण्याची चिन्हे आहेत.