मनपा कर विभाग प्रमुखाकडून कामकाज काढले
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
अतिक्रमण हटाव कारवाईवेळी पथकाला शहरातील अनधिकृत होल्डींगची माहिती न देणार्या जाहिरात कर विभाग प्रमुखाकडून या विभागाचे कामकाज काढून घेण्याचे आदेश आयुक्त पंकज जावळे यांनी दिले आहेत. जाहिरात फलक, होर्डिंग्ज आदींच्या मंजुरीचे काम आता अतिक्रमण निर्मूलन विभागाकडेच सोपवले जाणार आहे.
शहरात दिवसेंदिवस मोठ्या संख्येने जाहिरातीचे होर्डिंग्ज लावले जात असताना महापालिका प्रशासनाकडे मात्र अवघ्या दीडशे ते दोनशे होर्डिंग्जलाच परवानगी असल्याची माहिती समोर आली आहे. या विभागाचे प्रमुख सुबोध देशमुख यांच्याकडे किती होर्डिंग्जला परवानगी आहे, याची माहितीही उपलब्ध नाही. काही दिवसांपूर्वी प्रोफेसर कॉलनी चौक येथे फलक कढण्यावरून वाद निर्माण झाला होता. यावेळीही देशमुख यांनी कोणतीच माहिती दिली नव्हती. तसेच, न्यायालयाच्या निर्देशानुसार परवानगी दिलेल्या प्रत्येक फलकावर बार कोड बंधनकारक केलेला आहे. त्यासाठी वेब अॅप्लिकेशन तयार करणे अपेक्षित होते.
याची साधी माहितीही या विभाग प्रमुखाला नसल्याचे उपायुक्त अजित निकत यांच्या तपासणीत समोर आले. अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाईच्या दृष्टीने कोणतीच कार्यवाही होत नसल्याने अखेर या विभागाचे काम देशमुख यांच्याकडून काढून अतिक्रमण निर्मूलन विभागाकडे सोपवण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. तशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. दरम्यान, शहरात केवळ चंगेडिया आऊटडोअर या एकाच कंपनीला परवानगी दिलेली आहे. इतर कंपन्यांचे सर्व होर्डिंग्ज अनधिकृत आहेत. अधिकार्यांनी माहिती घेण्यास सुरूवात केल्यानंतर देशमुख यांनी आणखी एका कंपनीचा प्रस्ताव घाईघाईने परवानगीसाठी सादर केला आहे. त्यामुळे शहरात अनधिकृत होर्डिंग्ज असल्याचे माहिती असूनही, त्यावर जाणीवपूर्वक कारवाई केलेली नाही.