
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
कापड बाजारातील दोन व्यापार्यांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर बाजारपेठेतील अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मनपा प्रशासनाने शनिवारपासून बाजारपेठेतील अतिक्रमणांवर कारवाई सुरू केली आहे. काल, सोमवारी तिसर्या दिवशीही अतिक्रमण हटाव मोहिम सुरूच होती. मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे, अतिरिक्त आयुक्त प्रदीप पठारे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून पाहणी केली. दरम्यान, अतिक्रमणधारकांना बेग पटांगण येथे पर्यायी जागा देण्यात येईल, लवकरच याबाबत व्यवस्था केली जाईल, असे आयुक्त डॉ. जावळे यांनी सांगितले.
यावेळी अतिक्रमण निर्मूलन विभाग प्रमुख सुरेश इथापे यांच्यासह मनपा व पोलीस अधिकारी, अंमलदार उपस्थित होते. कापड बाजार परिसरातील अतिक्रमण हटाव मोहिमेची आयुक्त डॉ. जावळे यांनी पाहणी केली. नगर शहरामध्ये अतिक्रमण हटाव मोहीम कायमस्वरूपी सुरू राहील. हातगाडीधारकांना पर्यायी व्यवस्था म्हणून बेगपटांगण येथे तात्पुरती व्यवस्था केली आहे. तसेच अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असून नागरिकांनीही सहकार्य करावे असे आवाहनही आयुक्त डॉ. जावळे यांनी केले.
दरम्यान, इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली काल पुन्हा अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात आली. भिंगारवाला चौक, एमजी रोड, तेलीखुंट, शहाजी रोड, नवीपेठ, मोची गल्ली, गंजबाजार, रंगभवन परिसर येथील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आल्याचे इथापे यांनी सांगितले. अतिक्रमणात येत असलेल्या हातगाड्या, टपर्या, बॅनर, प्लास्टिक व पत्र्याचे शेड काढण्यात येऊन अतिक्रमण केलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे.