नगरपालिका क्षेत्रात चाचण्यांची संख्या वाढवा

नगरपालिका क्षेत्रात चाचण्यांची संख्या वाढवा

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचे निर्देश

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात करोना संसर्ग रोखण्यासाठी दैनंदिन चाचण्यांची संख्या वाढविण्यात येत आहे. दैनंदिन 20 हजारांपेक्षा जास्त चाचण्या गेल्या काही दिवसांत होत आहेत. त्यामुळे बाधितांना तसेच त्यांच्या निकट संपर्कातील व्यक्तींना शोधून करोना संसर्गाची साखळी तोडण्याचे प्रयत्न होत आहेत. मात्र, अद्यापही जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रात चाचण्यांची संख्या अजून वाढविण्याची गरज आहे. त्यादृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले.

जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी गुरूवारी तालुकास्तरीय यंत्रणांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधून करोना उपाययोजना आणि त्याबाबत तालुकास्तरीय यंत्रणांना येणार्‍या अडचणी, करावयाची कार्यवाही आदींबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित सर्व शासकीय विभागचे अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

दैनंदिन चाचण्यांची संख्या आता वाढविली आहे. त्याप्रमाणे काही तालुक्यांत तसेच नगरपालिका क्षेत्रात चाचण्या होत आहेत. मात्र, अद्यापही काही नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रात होणार्‍या चाचण्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे याठिकाणी चाचण्यांची संख्या वाढविण्यात यावी. केवळ सार्वजनिक ठिकाणी विनाकारण फिरणार्‍या नागरिकांच्या होणार्‍या अ‍ॅण्टीजेन चाचणी व्यतिरिक्त प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी किंवा बाधित रुग्ण आढळून येणार्‍या ठिकाणी चाचण्या होणे आवश्यक आहे.

सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतींनी त्यादृष्टीने कार्यवाहीच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिल्या. सर्व उपविभागीय अधिकारी आणि तालुकास्तरीय अधिकारी यांना प्रत्येक गावात करोनामुक्तीचा हिवरे बाजार पॅटर्न राबविण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या खासगी हॉस्पिटलमध्ये 15 पेक्षा जास्त बेडस् आहेत. अशा ह़ॉस्पिटल्सनीही स्वत:चे ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प उभारणी कऱण्यासाठी पुढाकार घ्यावा. संभाव्य तिसर्‍या लाटेचा सामना करण्यासाठी सर्वांनी सज्ज राहणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रत्येक तहसीलदार यांनी त्यांच्या तालुक्यातील मोठे हॉस्पिटल्सच्या संचालकांना याबाबत पुढाकार घेण्याबाबत सांगावे.

संभाव्य तिसर्‍या लाटेत लहान मुलांना संसर्गाची भीती व्यक्त केली जात आहे. त्यापार्श्वभूमीवर आरोग्याच्या पायाभूत सुविधांच्या बाबतीत जिल्ह्यात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी सर्वांचा सहभाग असणे अपेक्षित असल्याचे ते म्हणाले. त्यादृष्टीने तालुकास्तरीय यंत्रणांनी त्यांच्या तालुक्यातील बालरोगतज्ज्ञ, फिजीशियन आदींचा टास्क फोर्स बनवावा, असे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी नमूद केले.

तालुक्यांनी सुरु केलेले नियंत्रण कक्ष 24 बाय 7 कार्यान्वित असतील, याकडे लक्ष द्या. तेथे विचारणा करणार्‍यांना योग्य माहिती मिळेल हे पाहण्याची सूचना त्यांनी केली. सध्या काही बाजार समिती आणि उपबाजार समित्यांना ठराविक कालावधीसाठी व्यवहार सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. याठिकाणी विनाकारण गर्दी होणार नाही, कोविड सुसंगत वर्तणुकीबाबतचे सर्व नियम पाळले जात आहेत, मास्कचा वापर, सोशल डिस्टंन्सिंगचे पालन, सॅनिटायझरचा वापर होत असल्याबाबत खात्री करावी. याचे उल्लंघन करणार्‍या व्यक्तींवर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com