
कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav
तालुक्यातील आत्मा मालिक रुग्णालयातील मेडिकल चालविण्याचे बदल्यात 1 कोटी 77 लाख 65 हजार 862 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुबंई येथील साईबाबा मेडिकल रिसर्च अँड इंडस्ट्रीज प्रा.ली.चे अध्यक्ष आरोपी डॉ.सुमन सुकुमार बंडोपाध्याय व उपाध्यक्ष संजय नंदू कोळी यांच्या विरोधात कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
निलेश रवींद्र चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, आत्मा मालिक हॉस्पिटल दोन वर्षांपूर्वी मुंबई येथील साईबाबा मेडिकल रिसर्च अॅड इंडस्ट्रीज प्रा.ली.चे अध्यक्ष डॉ.सुमन बंडोपाध्याय रा. मुंबई हे व उपाध्यक्ष संजय कोळी, रा. बारामती, जि.पुणे यांना चालविण्यास दिले होते. त्यांनी आत्मा मलिक रुग्णालय कराराने चालविण्यास घेतले होते. त्यांना एका मेडिकल चालविणार्या इसमांची गरज होती.
हि माहिती समजल्यावर निलेश चौधरी यांनी त्यांचेशी संपर्क साधला. त्यानुसार डॉ.सुमन बंडोपाध्याय यांचेशी चर्चा झाली. त्यानुसार 30 लाख रुपयांची अनामत रक्कम मागितली होती. मात्र एवढी रक्कम नसल्याने चौधरी यांनी संस्थेच्या नावाने 5 लाख रुपयांचा डिमांड ड्राफ्ट करार करून दिला होता. सदर व्यवहारात एकूण 1 कोटी रुपयांचा व्यवहार ठरला होता. त्यात त्यांना 30 लाखांचा करारनामा केल्यावर तर उर्वरित 70 लाख रुपयांची रक्कम नफ्यातून देण्याचे ठरले होते.
त्यानुसार चौधरी यांनी सदर कंपनीस दि.30 जुलै 2021 रोजी 05 लाख रुपयांचा डिमांड ड्राफ्ट, 02 ऑगस्ट रोजी 15 लाख धनादेशाने तर दि.30 ऑगष्ट रोजी आर.टी.जी.एस.ने 05 लाख दि.27 सप्टेंबर 2021 रोजी 02 लाख असे एकूण 27 लाख रुपये संस्थेच्या नावावर जमा केले होते व त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना 64 हजार 862 रुपयांची औषधे दिली. त्यानंतर चौधरी यांनी मेडिकलचा ताबा मिळविण्यासाठी पाठपुरावा केला असता त्यांनी टाळाटाळ केली.
या दरम्यान चौधरी यांची शैनेश सिद्धान नाशिक, नितीन जाधव रा. रानवड, जि.नाशिक, धनंजय श्रीहरी पाटील रा.तळेगाव रोही,ता.चांदवड, आकाश आनंदा मवाळ रा.विष्णूनगर विंचूर, राहुल उत्तम कहाणे रा.नांदूर मधमेश्वर सर्व ता.निफाड आदीं पाच जणांशी ओळख झाली. या सर्वांकडून संस्था चालकांनी मेडिकल अनामत रकमेपोटी 01 कोटी 50 लाख इतकी रक्कम विविध बँकांच्या धनादेशाद्वारे घेतली होती.
ही माहीती चौधरी यांना मिळल्यानंतर त्यांनी संस्था चालकाला फोन केला असता त्यांनी सदर रुग्णालय चालविण्याचे सोडून दिले असल्याचे सांगितले.त्यानंतर चौधरी यांनी दिलेल्या रकमेची मागणी केली.संस्थाचलकांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्यांचे फोन बंद येऊ लागले आहे. त्यामुळे चौधरी यांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले.
याप्रकरणी फिर्यादी निलेश रवींद्र चौधरी यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल केला आहे. कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भा.द.वि.कलम 34, 406, 420 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे करीत आहेत.