व्यापार्‍याची दोन कोटींची फसवणूक : श्रीरामपूरच्या पिता-पुत्रास अटक

व्यापार्‍याची दोन कोटींची फसवणूक : श्रीरामपूरच्या पिता-पुत्रास अटक

श्रीरामपूर (प्रतिनिधी) / Shrirampur - सुवर्णालंकार व डायमंड अलंकाराच्या व्यवहारापोटी मुंबई येथील व्यापार्‍याची सुमारे दोन कोटी रुपयांची फसवणूक करणार्‍या श्रीरामपुरातील पिता-पूत्र आरोपींना काल श्रीरामपूर शहर पोलीस पथकाने नांदेड जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे.

श्रीरामपूर शहरातील वैष्णवी अलंकारगृह येथील अक्षय बाळासाहेब डहाळे व बाळासाहेब विश्‍वनाथ डहाळे यांनी मुंबई येथील व्यापारी दिनेश प्रकाश मेहता यांच्याकडून सुमारे 1 कोटी 98 लाख 6 हजार रुपयांचे सुवर्णालंकार व डायमंड अलंकाराचा व्यवहार केला होता.

या अलंकाराची रक्कम दिनेश मेहता यांनी अक्षय डहाळे व बाळासाहेब डहाळे यांच्याकडे मागितली असता त्यांनी दिली नाही. उलट मेहता यांना रक्कम व अलंकार परत न करता तुला जे करायचे ते कर, तुझे सोने व डायमंडचे अलंकार आम्ही देणार नाही व पैसेही देणार नाही, असे बोलून मेहता यांची रक्कम बुडवण्याच्या हेतूने मेहता यांचे सुवर्णालंकार संगनमत करून, विश्‍वास संपादन करून, हडपण्यासाठी फसवणूक केली होती.

या प्रकरणातील आरोपी हे नांदेड जिल्ह्यात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय सानप यांना मिळाली त्यानुसार त्यांनी एक पोलीस पथक नांदेड जिल्ह्यातील उमरखेड या ठिकाणी पाठवून तेथून अक्षय बाळासाहेब डहाळे याला ताब्यात घेतले त्यानंतर त्याचे वडील बाळासाहेब डहाळे यासही ताब्यात घेतले.

काल या दोघांनाही श्रीरामपूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांंना 15 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com