गुन्हेगारांना मदत करणार्‍यांना कडक शासन करणार - पोलीस महासंचालक शेखर

मुल्ला कटर प्रकरणातील आणखी दोघांना लवकरच ताब्यात घेणार
गुन्हेगारांना मदत करणार्‍यांना कडक शासन करणार - पोलीस महासंचालक शेखर

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

गुन्हेगारांना मदत करणार्‍या कोणाचीही गय केली जाणार नाही. त्यात पोलिसांचा समावेश असेल तर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा नाशिक विभागाचे विशेष पोलीस महासंचालक बी. जे. शेखर यांनी दिला. तसेच श्रीरामपुरातील मुल्ला कटर प्रकरणात अद्यापपर्यंत चार गुन्हे उघडकीस आले असून अजून दोघे निष्पन्न झाले आहेत. लवकरच त्यांना ताब्यात घेऊ, अशी माहिती श्री. शेखर यांनी दिली.

विशेष पोलीस महासंचालक बी. जी. शेखर यांनी काल सायंकाळी अचानक श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यास भेट दिली त्याप्रसंगी त्यांनी माहिती दिली. यावेळी पोलीस अधीक्षक़ मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके आदी पोलीस अधिकारी उपस्थित होते.

गुन्हेगारांना मदत केल्याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सानप व एका पोलीस कर्मचार्‍यास निलंबित केल्याप्रकरणी पोलीस महासंचालक यांनी माहिती घेतली. त्यावेळी ते बोलत होते. गुन्हेगारांना मदत करणे हा गुन्हे करणार्‍यांपेक्षा मोठा गुन्हा आहे. त्यामुळे गुन्हेगारांना मदत करणार्‍यांना कडक शासन करणार आहोत. यात पोलीस आढळल्यास त्याहून अधिक कडक कारवाई करण्याचे संकेतही त्यांनी दिले. याप्रकरणात आणखी दोघे निष्षन्न झाले असून लवकरात लवकर त्यांना ताब्यात घेऊ, असे श्री. शेखर यांनी सांगितले.

श्रीरामपूर शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले असून गुन्हेगारी कमी करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. गणेशोत्सव शांततेत साजरे करा, डिजेचा आवाज कमीच ठेवा. नगर येथे डीजे मुळे दोन पोलिसांच्या कानाचे पडदे फाटले गेले. त्यामुळे डिजे वाद्याऐवजी सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांवर भर देवून देखावे सादर केले पाहिजे.

जातीय सलोख्याचे उदाहरण देत म्हणाले की, धुळे येथे मानाच्या गणपतीची मिरवणूक मस्जिदसमोरुन जाते त्यावेळी त्या मस्जीदचे मौलाना इमारतीवरुन त्या गणरायाच्या मूर्तीवर फुलांचा वर्षाव करतात, अशा प्रकारचा जातीय सलोखा या ठिकाणी राखावा, असे आवाहन त्यांनी केले.

दोन टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहरातील गुन्हेगारीतील दोन टोळ्यांना तीन जिल्ह्यातून तडीपार केले होते. मात्र त्यांच्या तडीपारी रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र त्या गुन्हेगारांच्या तांत्रिक बाबी तपासून त्यांच्याविरुध्द मोक्कांतर्गत कारवाई करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com