पावसातही महिलांच्या डोक्यावर सरपणाची मोळी

पावसातही महिलांच्या डोक्यावर सरपणाची मोळी

घारगाव |वार्ताहर| Ghargav

घरगुती गॅस सिलिंडरचे दर हजारावर भिडल्याने आदिवासी भागासह ग्रामीण भागातील गोरगरीब मध्यमवर्गीयांना सिलिंडरवर स्वयंपाक करणे परवडत नाही. महिला आता सिलिंडर बाजूला ठेवून चूल पेटविण्यासाठी भर पावसात सरपण गोळा करत डोक्यावर सरपणाची मोळी घेऊन जात असल्याचे चित्र संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील हिवरगाव पठार परिसरात पहावयास मिळत आहे.

गॅस सिलिंडरचे वाढलेले दर पाहता सद्यस्थितीत कुटुंबाचा स्वयंपाक करण्यासाठी सिलिंडरमध्ये गॅस नाही. सबसिडीही मिळत नाही. भर पावसात रानावनात भटकंती करून लाकडाच्या काड्या गोळा करून अर्धा ते एक किलोमीटर अंतरावर महिलांना डोक्यावर लाकडाची मोळी घेऊन पायपीट करावी लागत आहे. भिजलेली लाकडे पेटविण्यासाठी मोठी कसरत करावी लागते आहे.

ग्रामीण व आदिवासी भागात गरीब महिलांना धुरापासून मुक्ती मिळावी, यासाठी केंद्र सरकारने उज्ज्वला गॅस योजना आणली. या योजनेचा काही कुटुंबांना अद्यापही लाभ मिळालेला दिसत नाही. ज्यांना लाभ मिळाला त्यांचेही सिलिंडर दरात मोठी वाढ झाल्याने आर्थिक बजट बिघडले. ग्रामीण भागात महिला चुलीकडे वळल्या आहेत. सिलिंडरचा दर एक हजार रुपयांपर्यंत पोहचल्याने एवढी रक्कम आणायची कुठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शेतात मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. 200 ते 250 रुपये रोज मिळतो. आता पावसाचे दिवस आहेत. पाऊस जास्त असल्याने शेतात काम नाही. त्यामुळे पैसे येणे बंद झाले आहे. अशा परिस्थितीत एक हजार साठ रुपये खर्च करणे सामान्य कुटुंबाला परवडत नाही. त्यामुळे जंगलात लाकडाच्या काड्या गोळा करून चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे.

-अनिता केदार, हिवरगाव पठार

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com