मुळा पाणलोटात पावसाने दडी मारल्याने निचांकी आवक

मुळा पाणलोटात पावसाने दडी मारल्याने निचांकी आवक

राहुरी|प्रतिनिधी|Rahuri

राहुरी तालुक्यातील मुळा धरणलाभक्षेत्रात वरूणराजा मेहेरबान असताना दुसरीकडे मात्र, धरणाच्या पाणलोटक्षेत्रात वरूणराजाची अवकृपा होत असल्याचे दिसत आहे. धरणात सध्या ऑगस्ट महिना उजाडल्यानंतरही केवळ 47 टक्के जलसाठा शिल्लक आहे.

धरणाच्या उगमस्थाना कडील भागात पावसाने ओढ दिल्याने चिंतेत भर पडल्याचे चित्र धरणक्षेत्रात असून निसर्ग चक्रीवादळानंतरचा परिणाम झाला काय? असा प्रश्न धरण क्षेत्रातील जाणकार मंडळींनी केला आहे.

दि.3 जून 2020 ला निसर्ग चक्रीवादळाचा फटका कोकणाला बसला. तसेच पश्चिम, मध्यमहाराष्ट्रातील पुणे, नगर, नाशिक भागात गोलाकार वारे वाहिले. तेव्हपासून धरणाखालील बुडीत क्षेत्रात (लाभक्षेत्रात) पावसाने जणू मुक्काम केला आहे. राहुरी तालुक्यात मुळा धरणाच्या बुडीत क्षेत्रात लाभक्षेत्र अखेर एकूण 644 मिमी. पाऊस झाला आहे. मात्र, पाणलोट क्षेत्रात महिनाभरापासून पावसाने ओढ दिल्याचे चित्र आहे.

मुळा धरणात गेल्या सात वर्षांतील सर्वांत कमी पाणीसाठा म्हणून नोंद झाली असून कालचा 12 हजार 197 दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी धरण दि. 1 ऑगस्ट 2019 रोजी निम्मे भरले होते. तर पाणलोटक्षेत्रात पाऊस चांगला सक्रिय होता.

दि.31 जुलै या दिवशी गेल्या पंधरा वर्षांमध्ये सन 2004, 2008, 2010, 2012 यावर्षी नीचांकी पाणीसाठा शिल्लक होता. सन 2006 साली दि. 3 ऑगस्ट रोजी धरण ओव्हरफ्लो झाले होते. मात्र, आता 6 ऑगस्ट उजाडूनही धरणात धिम्यागतीने आवक होत असल्याने सध्या धरणक्षेत्रात चिंतेत भर पडली आहे.

मुळा धरणक्षेत्रात नारळी पौर्णिमेनंतर पाऊस कमी होत बुडीतक्षेत्र अर्थात धरण धरणक्षेत्रात होणार्‍या पावसावर अवलंबून असते. सध्या धरण क्षेत्रातील पावसाने धरणात नव्याने पाच ते सहा टीएमसी पाणी जमा झालेले आहे. याशिवाय मागील साठा 25 टक्क्यांपर्यंत शिल्लक होता.

त्यामुळे धरणाच्या उगमस्थानाकडील भागात पाऊस रूसला काय? असा प्रश्न सर्वांनाच पडला असून हीच अवस्था अन्य धरणांच्या बाबतीत दिसून येत आहे. कोयना ते त्र्यंबकेश्वरच्या घाटमाथ्यावर तसेच महाबळेश्वरला देखील पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे धरणांच्या लाभक्षेत्रात काळजी व्यक्त करण्यात येत आहे.

यावर्षी धरणांच्या उगमस्थानाकडील भागात पावसाचे अत्यल्प प्रमाण असले तरी पुढील दीड महिन्यातील पुरेशा पावसामुळे धरणे पूर्ण क्षमतेने भरतील, अशी आशा आहे.

- इंजिनिअर सुरेश जगधने, सेवानिवृत्त अभियंता

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com