
कोतूळ, भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara
उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा पाणलोटानंतर आता मुळा पाणलोटातही काल बुधवारी पावसाने जोरदार सलामी दिली. कोतूळमध्ये काल अर्धा तास सरी कोसळत होत्या. पाणलोटातही पाऊस सुरू झाल्याने शेतकर्यांना दिलासा मिळाला असून शेती कामांनी वेग घेतला आहे.
भंडारदरा पाणलोटात अधूनमधून पडणार्या सरींमुळे धरणात आवक सुरू आहे. गत 24 तासांत भंडारदरात 20 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले.
पाणलोटात मान्सून रविवारी दाखल झाला. त्यानंतर अधून मधून सरी कोसळत आहे. पावसाने फारसा जोर पकडला नसलातरी पडणार्या पावसामुळे ओढेनाले सक्रिय झाले आहेत.
काल सकाळी संपलेल्या 24 तासांत भंडारदारत 13, घाटघर 28, पांजरे 30, रतनवाडी 39 तर वाकी 9 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पडणार्या पावसामुळे शेती कामांना वेग आला आहे. पाऊस सुरू असल्याने बाजारात रेनकोट, छत्र्या, पानकागद व अन्य साहित्य दाखल झाले आहे. 112 दलघफू क्षमतेच्या वाकी तलावात यंदा साठा चांगला असून पावसाचे प्रमाण वाढल्यास दोन तीन दिवसांत हा तलाव निम्मा भरलेला असेल.
कुकडी पाणलोटातही हजेरी
दक्षिण नगर जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या समजल्या जाणार्या कुकडी प्रकल्पाच्या पाणलोटात काल बुधवारी पावसाने प्रथमच हजेरी लावल्याने या समूहातील धरणांमध्ये अल्प प्रमाणात आवक होऊ लागली आहे. पडता पाऊस सुरू झाल्याने पाणलोटासह लाभक्षेत्रात दिलासा मिळाला आहे.