मुळा पाणी प्रश्नी 14 जून पासून किसान सभेचा सत्याग्रह

मुळा पाणी प्रश्नी 14 जून पासून किसान सभेचा सत्याग्रह

कोतुळ |वार्ताहर| Kotul

मुळा खोर्‍यातील पाण्याचे समन्यायी पुर्नवाटप करून अकोले विधानसभा मतदार संघातील आदिवासी व बिगर आदिवासी जनतेला शेती व पिण्यासाठी पाण्याचा रास्त वाटा द्या, हिरड्यांची सरकारी खरेदी सुरू करा, कोतुळ आंदोलनात मान्य केलेल्या रस्त्यांची कामे तातडीने सुरू करा, तोलार खिंड फोडून परिसराला मुंबई बाजारपेठेशी जोडा, शेती व वस्तीसाठी वीज द्या या प्रमुख मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीने 14 जून रोजी कोतुळ येथील मुख्य चौकात सत्याग्रह सुरू करण्यात येत आहे.

पिंपळगाव खांड धरणाच्या पाण्याबाबत कोतुळ खोर्‍यात संघर्ष सुरू आहे. आंदोलक आपल्या परिसरातील जनतेची बाजू घेऊन संघर्ष करत आहेत. पिंपळगाव खांड धरणात साठलेले ओंजळभर पाणी वाटण्यावरून परिसरात तणाव आहे. मुळा धरणाच्यावर हरीश्चंद्र गडाच्या पायथ्यापर्यंत पाण्याचा साठा अत्यल्प आहे. मुळा खोर्‍यातील सर्व पाणी मुळा धरणात प्रामुख्यानं साठवण्यात येऊन मुळा धरणाच्या खाली शेतीला व शहरांना हे पाणी पुरवले जात आहे. खोर्‍यातील बहुतांश पाणी मुळा धरणात साठवल्यामुळे मुळा धरणाच्या वरील भागातील अकोले व संगमनेर तालुक्यातील शेतकरी पाण्यापासून वंचित राहिले आहेत.

प्रवरा खोर्‍यात पाणी पुर्नवाटपाची ऐतिहासिक लढाई झाली व त्यामुळे अकोले तालुक्यात प्रवरेच्या पाण्याचे पुर्नवाटप करून पाण्याचा हक्क मिळाला. निळवंडे धरणाच्या बाबतही निळवंडेत अकोल्याचा वाटा किती यावरून संघर्ष झाला व उच्चस्तरीय कालव्याची निर्मिती करुन अकोले तालुक्यावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी यशस्वी लढा देण्यात आला. मुळा खोर्‍यात मात्र अशी मूलभूत लढाई अद्याप झालेली नाही.

पिंपळगाव खांड धरणात साठलेल्या अत्यल्प पाण्यात वाटा मागण्यावरून सुरू असलेल्या संघर्षाला व्यापक करण्याची आवश्यकता आहे. मुळा धरण बांधले म्हणजे धरणाच्या वरील भागातील आदिवासी व बिगर आदिवासी सर्व शेतकर्‍यांना पाण्यापासून कायमस्वरूपी वंचित ठेवण्याचा कायदा झाला असे होत नाही. राज्यात समन्यायी पाणीवाटपाचे धोरण असल्यामुळे अन्यायकारक पद्धतीने मुळा खोर्‍याचे झालेले पाणी वाटप दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे. मुळा धरणाच्यावर हरिश्चंद्रगडापर्यंत ठीकठिकाणी पाणी साठवण्याच्या साईट्स उपलब्ध आहेत. मात्र केवळ पाणी उपलब्ध नाही हे कारण सांगून येथील जनतेला पाण्यापासून वंचित ठेवण्यात येत आहे. 14 जून पासून कोतुळ येथे सुरू होणार्‍या किसान सभेच्या आंदोलनात या मूलभूत मुद्द्याला केंद्रस्थानी आणण्यासाठी किसान सभा आग्रही असणार आहे.

पाणी प्रश्ना बरोबरच आदिवासी भागात सरकारी हिरडा खरेदी तातडीने सुरू करावी, तोलार खिंड फोडून परिसराला मुंबई बाजारपेठेशी जोडावे, निराधारांना 21 हजाराच्या आत उत्पन्न दाखले द्यावेत, पिंपळगाव खांड, फोपसंडी व कोतुळ परिसरातील वाड्या-वस्त्यांचे बंद पाडण्यात आलेले रस्ते तातडीने खुले करून त्यांचे मजबुतीकरण व दुरुस्तीकरण करावे यासारख्या मागण्यांच्याबाबत या आंदोलनात आवाज उठवण्यात येणार आहे. 14 जून रोजी सुरू होणार्‍या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी 15 जून रोजी किसान सभेच्या वतीने कोतुळ येथे मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, राजू गंभीरे, भीमा मुठे, प्रकाश साबळे, साहेबराव घोडे, शांताराम वारे, किसन मधे, निवृत्ती डोखे, देवराम डोखे, सुरेश गिर्‍हे हे प्रयत्नशील आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com