सोनई (वार्ताहर) -

मुळा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी नानासाहेब तुवर यांची तर उपाध्यक्षपदी कडूपाटील-कर्डिले यांची सर्वानुमते

निवड झाली.

कारखान्याच्या संचालक मंडळाची बिनविरोध निवड झाल्यानंतर काल अध्यासी अधिकारी तथा नगर विभागाचे प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अध्यक्ष व उपाध्यक्षांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

अध्यक्षपदासाठी निलेश विठ्ठलराव पाटील यांनी नानासाहेब तुवर यांचे नाव सुचविले. त्यास बाळासाहेब आसाराम गोरे यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी बापूसाहेब शंकर शेटे यांनी कडूपाटील कर्डिले यांचे नाव सुचविले व संचालिका ताराबाई सुखदेव पंडित यांनी अनुमोदन दिले. सभेचे अध्यक्ष यांनी या दोन्ही निवडी बिनविरोध जाहीर केल्या. नवनिर्वाचित संचालक तसेच बिनविरोध निवडून आलेले अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे अभिनंदन केले.

कारखान्याचे संचालक जलसंधारण खात्याचे मंत्री नामदार शंकरराव गडाख हे मंत्रालयीन कामासाठी मुंबईत असल्याने ते या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. संचालक मंडळाची बैठक संपल्यानंतर नवीन पदाधिकारी व संचालकांनी मुळा कारखान्याचे संस्थापक ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. याप्रसंगी नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी कारखान्याचे सर्व संचालक, कार्यकर्ते व कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते.