‘मुळा’चे आवर्तन सोडून नेवासा तालुक्यातील पिके वाचवा

सलाबतपूर परिसरातील शेतकर्‍यांची मागणी
‘मुळा’चे आवर्तन सोडून नेवासा तालुक्यातील पिके वाचवा
File Photo

सलाबतपूर |वार्ताहर| Salabatpur

नेवासा तालुक्यातील सलाबतपूर परिसरात रब्बी हंगामातील पिकांना पाण्याची नितांत गरज असून मुळा कालव्यातून लवकर आवर्तन सोडावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

सध्या रब्बीतील गहु हरभरा तुर, मका, ऊस, कांदा या पिकांना सध्याच पाण्याची गरज आहे. अनेकांच्या विहीर, कुपनलिकांची पाणीपातळी खालावली असून शेतकर्‍यांची पिके सध्या जोमदार आहेत. मात्र पिकांना वेळीच पाणी मिळाले नाही तर पिके जळून खाक होऊन जाण्याची भिती निर्माण झाली आहे. यावर्षी रब्बी पिकांना हवामानातील वातावरण अनूकुल आहे. अनेकांची पिके जोमदार आहे. मात्र पाटपाणी जर उशिरा आले तर मात्र पिकांची वाट लागल्याशिवाय राहणार नाही. यावर्षी खरीप पिकांची अस्मानी संकटाने पार दयनीय अवस्था करून टाकली होती.

जास्तीच्या पावसाने खरीप पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होते. अनेक शेतकर्‍यांना सुरुवातातीला दुबार पेरणीच्या संकटाला सामोरं जावं आणि नंतर पुन्हा आस्मानी संकटाला. यामुळे शेतकर्‍यांची अर्थव्यवस्था पुरती कोलमडली आहे. यंदा कापसाला उच्चांकी थेट आठ हजाराचा भाव मिळाला. मात्र शेतकर्‍यांचा कापूस पावसाच्या अवकृपेने पूर्णपणे वाया गेला होता. तर सोयाबीन पाण्याने सडून गेली होती. तसेच अनेकांच्या तुर पिकावर मर रोग आल्याने तुर उत्पादनात कमालीची घट झाली आहे.

खरिपाची वाट लागल्याने आधीच शेतकरी हवालदिल झाले आहे. अर्थिकदृष्टया शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे आता शेतकर्‍यांना रब्बी पिकांतून चांगले उत्पादन मिळण्याची आशा आहे. मात्र विहिर व कुपनलिका यांची पाणीपातळी खालावली असल्याने पुन्हा चिंतेचे ढग दाटुन येऊ लागले आहे. शेती पिकांना लवकर पाणी मिळाले नाही तर पिके जळून जातील व शेतकर्‍यांचे अर्थिक नुकसान होवून पुन्हा शेतकरी कर्जबाजारी होऊ शकतो. त्यामुळे लवकरात लवकर मुळातून आवर्तन सोडून शेती पिके व शेतकर्‍यांनाही वाचवा, अशी मागणी परिसरातून होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com