मुळा नदीवरील तुटक्या पादचारी मार्गाची तातडीने दुरूस्ती

आ. प्राजक्त तनपुरेंनी घेतली तातडीने दखल
मुळा नदीवरील तुटक्या पादचारी मार्गाची तातडीने दुरूस्ती

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

नगर-मनमाड रोडवरील मुळा नदीचा पुल पादचारी व शाळकरी मुलांसाठी अत्यंत धोकेदायक बनला. माजीमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या तत्त्परतेमुळे या पुलाची तत्काळ दुरुस्ती झाल्याने भविष्यात होणारा अपघात टळला.

नगर-मनमाड महामार्गावरील मुळा नदीवरील पुलावरुन देसवंडी, पिंप्री अवघड, गोटुंबे आखाडा, राहुरी खुर्द येथील सुमारे तीनशे ते चारशे मुले राहुरी शहरातील शाळेत शिकण्यासाठी रोज पायी सायकलने पुलावरुन प्रवास करतात. परंतु या पुलावरील साईड फुटपाथची संबंधित खात्याने दोन वर्ष साफसफाई न केल्याने पावसामुळे पुलाच्या फुटपाथवर एक फुटाचा गाळ साचून त्यावर गवतही उगल्याने शाळकरी विद्यार्थी व पादचार्‍यांना अडचणीचे झाले होते. त्यामुळे शाळकरी मुले मधल्या मुख्य रस्त्याने प्रवास करीत असल्याने पुलावरील साचलेला चिखलमिश्रीत घाण पाणी वाहनांमुळे मुलांच्या अंगावर उडत होते. घाण पाणी अंगावर उडू नये म्हणून रस्त्यावर शाळकरी विद्यार्थी व पायी प्रवासी सैरावैरा पळत होते. त्यामुळे पुलावर मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली होती.

राहुरी खुर्द येथील अय्युब पठाण, फिरोजभाई फिटर, युवराज तोडमल, ग्रामपंचायत सदस्य असफ पठाण यांनी माजीमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांना मुळा नदी पुलावरील चिखलामुळे पुला वर मोठा अपघात होऊ शकतो, असे सांगून पुलावरील चिखल मातीचा गाळ संबंधित खात्याकडून काढण्याची मागणी केली. क्षणाचा विचार न करता आ.तनपुरे यांनी जागतिक प्रकल्प अधिकारी दिवान यांना पुलावरील मातीमिश्रित गाळ साफ करण्याची सूचना केली. त्याप्रमाणे संबंधित खात्याने आपली यंत्रणा पाठवून साफ सफाईचे काम सुरू केल्याने भविष्यात होणारा अपघात टळल्याने देसवंडी, तमनर आखाडा, गोटुंबे आखाडा, राहुरी खुर्द येथील विद्यार्थ्यांच्या पालकांनी व पायी प्रवास करणार्‍या नागरिकांनी आमदार प्राजक्त तनपुरे यांचे आभार मानले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com