
घारगाव |वार्ताहर| Ghargav
वाळू तस्करीसाठी मुळा नदीपात्रात मातीचा बंधारा घालून रस्ता तयार करणारे वाळू तस्कर असो किंवा इतर दुसरे कोणी असो या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात येऊन कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसीलदार अमोल निकम यांनी सांगितले.
पठार भागातील मुळा नदीपात्रात खैरदरा या परिसरात काही दिवसांपूर्वी वाळूतस्करांनी मातीचा बंधारा घालून पारनेर तालुक्यातील पवळदरा परिसरा पर्यंत हा रस्ता निर्माण केला होता. बेकायदेशीररित्या पाणी अडवून, पाण्यामध्ये मोठा बंधारा घालून हा रस्ता तयार करण्यात येऊन यावरून वाळू तस्करी सुरू होती. दैनिक सार्वमतने वाळूतस्करांच्या माती बांधाची पोलखोल केली आणि त्यानंतर वाळूतस्करांसह महसूल विभाग खडबडून जागे झाले. त्यानंतर सोमवारी दुपारी महसूल विभागाने त्याठिकाणी जेसीबी नेऊन कारवाई कारत पाण्यावरील मातीचा बंधारा काढून टाकला.
दरम्यान, खैरदरा परिसरात मोठ्या प्रमाणात दिवसा ढवळ्या वाळूतस्कर वाळू उपसा करतात. त्यानंतर मुळापात्रात माती बंधारा टाकतात. येथील तलाठी, मंडलाधिकारी, पोलीस पाटील यांच्या कार्यपद्धतीबाबत सार्वमतने प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर आता हा रस्ता तयार करणारे, रस्ता तयार करवून घेणारे, यासाठी ज्यांची यंत्रसामग्री वापरण्यात आली आहे ते, तसेच हा रस्ता करण्यासाठी ज्यांनी-ज्यांनी विशेष प्रयत्न आणि परिश्रम घेतले, अशा सगळ्यांचा शोध घेऊन त्या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे तहसीलदार अमोल निकम यांनी बुधवारी माध्यमांना सांगितले आहे. त्यामुळे पुढील काळात महसूल विभाग काय कारवाई करते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नांदूर खंदरमाळ गावांतर्गत असलेल्या खैरदरा व पारनेरच्या पवळदरा दरम्यान वाळूतस्करांनी अवैधरित्या वाळूउपसा करण्यासाठी नदी पात्रात मातीबंधारा केला होता. महसूलने पाण्यावरील माती बंधारा काढून टाकला. मात्र, तरीही पाण्याखाली बंधारा तसाच असल्याने मंगळवारी रात्री पुन्हा त्या बंधार्यावरून वाळूच्या वाहनांची वाहतूक सुरु झाली. त्यामुळे महसूल विभागाच्या काही स्थानिक कोतवाल, तलाठी, सर्कल यांचा अर्थपूर्ण संबंधातून पाठिबा असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.