मुळा उजवा कालवा दुरुस्तीसाठी 70 कोटींचा निधी मंजूर - आ. गडाख

मुळा उजवा कालवा दुरुस्तीसाठी 70 कोटींचा निधी मंजूर - आ. गडाख

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

मुळा उजवा कालव्याच्या दुरुस्तीसाठी 70 कोटी रुपयांच्या निधीस मंजूरी मिळून लवकरच निविदा प्रक्रियेस सुरुवात होणार असल्याची माहिती माजी जलसंधारण मंत्री आमदार शंकरराव गडाख यांनी दिली.

नेवासा, राहुरी, शेवगाव, पाथर्डी तालुक्यातील शेतकरी, जनतेसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या मुळा धरणावरील मुख्य कालवा, शाखा कालवा व त्यावरील वितरिका यांची अवस्था अत्यंत खराब झाली होती. त्यामुळे रोटेशन कालावधीत पाणी वेळेवर मिळण्यात अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे शेतकरी बंधावाची रोटेशन कालावधीत पाण्याची मोठी गैरसोय होत होती. शेतकर्‍यांच्या प्रश्नांसाठी नेहमी आग्रही भूमिका घेणार्‍या माजी जलसंधारण मंत्री आमदार शंकरराव गडाख यांनी तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचेकडे दुरुस्ती करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा असा प्रस्ताव तत्कालीन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे सदर केला होता. त्यानुसार माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील व जलसंधारण मंत्री यांच्या उपस्थितीत मुंबई येथे मंत्रालयात डिसेंबर 2021 मध्ये बैठक घेण्यात आली होती.

मुळा धरणाचा 52 किमी लांबीचा मुख्य उजवा कालवा, 30 किमी लांबी असलेल्या 4 उपशाखा व त्या अंतर्गत येणार्‍या 15 ते 20 किमीच्या वितरीका यांसाठी मुख्य उजवा कालवा हेड टू टेल दुरुस्ती, शाखा व वितरीका दुरुस्ती ,जुने बांधकाम दुरुस्ती, भराव मजबुतीकरण, आवश्यक त्या ठिकाणी अस्तरीकरण या कामासाठी 70 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला असून या कामास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. लवकरच निविदा प्रक्रिया होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे अशी माहिती आ. शंकरराव गडाख यांनी दिली.

यावेळी आमदार शंकरराव गडाख म्हणाले की, शेतकरी बांधवांची गेल्या अनेक वर्षांपासून मुळा उजवा कालवा, शाखा व मुख्य वितरीका यांची दुरुस्ती व्हावी ही मागणी होती.अनेक वेळा चालू रोटेशमध्ये कालवा फुटणे, कालव्यास असलेली गळती, वितरिका यांची पाणी वाहून नेण्याची कमी झालेली क्षमता यामुळे रोटेशन वेळेवर होऊनही टेलपर्यत पाणी मिळण्यास अडचणी येत होत्या. मुळा उजव्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी 70 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्यामुळे हेड टू टेल पाणी वेळेत मिळणार आहे.कालवे, शाखा व वितरीका यांमधून पाणी पूर्ण दाबाने जाईल व त्यामुळे शेतकर्‍यांना वेळेत पाणी उपलब्ध होऊन पिके चांगली येण्यास उपयोग होणार आहे, अनावश्यक ठिकाणी होणारी पाण्याची गळती थांबेल त्यामुळे कमी कालावधीत रोटेशन होईल.सदर काम गुणवत्तापूर्ण पद्धतीने व वेळेत पूर्ण करून घेण्यासाठी स्वतः लक्ष घालून काम पूर्ण करणार आहे.

आ. शंकरराव गडाख यांनी विशेष प्रयत्नपूर्वक मुळा उजवा कालव्यास निधी मंजूर करून आणल्याने वेळोवेळी कालवा फुटून रोटेशन काळात कालवा बंद करावा लागणार नाही व कालव्याच्या दुरुस्तीमुळे शेतकर्‍यांना टेल पर्यंत पाणी मिळण्यास मदत होईल.

- संतोष तांबे शेतकरी, देडगाव.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com