
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
मुळा धरणाच्या उजव्या कालव्याची अवस्था दयनीय झाल्याने पाण्याची गळती व पाण्याचा अपव्यय थांबून अधिक कार्यक्षमपणे पाण्याचे नियोजन करणे शक्य व्हावे यासाठी दुरूस्ती, बांधकामे, अस्तरीकरण पिंचीग यासारख्या कामांसाठी विशेष दुरूस्ती अंतर्गत 10 कोटी 27 लाख 21 हजार 500 रूपयांच्या खर्चाच्या प्रस्तावास अटींवर प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचे परिपत्रक काल जारी करण्यात आले आहे.
मुळा उजवा कालव्याची लांबी 52 किमी असून या कालव्याचे बांधकाम 1972-73 मध्ये पूर्ण झालेले आहे. या कालव्यातून पिण्याचे पाणी आणि शेतीचे आवर्तन सोडण्यात येते. पण या कालव्याची अवस्था बिकट झाली आहे. काही वेळा हा कालवा फुटतो. त्यात लाखो लिटर पाणी वाहून जाते. अनेक ठिकाणी पाण्याची गळती होते तसेच पाण्याचा अपव्यय होतो. याची दखल आजी माजी लोकप्रतिनिधींनी घेतली व त्यांनी या कालव्याच्या दुरूस्तीसाठी निधीची मागणी वेळोवेळी केली. त्यामुळे शासनाने पुढचे पाऊल टाकले आहे.
उजवा कालवा 15 ते 26 किमी मध्ये विविध ठिकाणी अस्तरीकरणाचे बरेच नुकसान झाले आहे त्यामुळे कालव्यातून गळती व पाझर होतआहे काही ठिकाणी कालव्याचा भरावही धोकादायक बनला आहे. त्यामुळे उजवा कालवा सा.क्र. 15/500 ते 26 किमी मधील अस्तरीकरण दुरूस्ती पिंचींग व निरीक्षण पथ व सेवापथाचे मजबुतीकरणाच्या अंदाजपत्रकास विशेष दुरूस्तीच्या चार कोटी तीन लाख श्याहत्तर हजार एकशे बहात्तर एवढ्या खर्चाच्या प्रस्तावास अटींवर प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
या कालव्याच्या सा.क्र. 26 ते 36 किमी मधील बांधकामे करण्यासाठी 1 कोटी अडुसष्ठ लाख अठ्ठ्यांऐशी हजार एकशे चोपन रूपये खर्चाच्या प्रस्तावास अटींवर प्रशासकीय मान्यत देण्यात आली आहे. तसेच सा.क्र.36/500 ते 47 किमी मधील बांधकामच्या अंदाजपत्रकास विशेष दुरूस्तीसाठी चार कोटी चौपन्न लाख सत्तावन हजार एकशे चौर्याहत्तर एवढ्या खर्चाच्या प्रस्तावास अटींवर प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे