‘मुळा प्रवरा’च्या मतदार यादीवरील हरकती संदर्भात उद्या सुनावणी

‘मुळा प्रवरा’च्या मतदार यादीवरील हरकती संदर्भात उद्या सुनावणी

श्रीरामपूर |प्रतिनिधी|Shrirampur

मुळा-प्रवरा वीज संस्थेच्या मतदार यादी संदर्भात आलेल्या हरकतींवर उद्या गुरुवार दि. 6 एप्रिल 2023 रोजी निर्णय देण्यात येणार आहे. अहमदनगर येथील जिल्हा उपनिबंधकांच्या कार्यालयात या संदर्भात सुनावणी ठेवण्यात आली आहे.

थकबाकीअभावी तसेच इतर काही अनुषंगिक बाबींमुळे मतदार यादीत नाव समाविष्ट न झाल्याबाबत सभासद ग्राहकांकडून या हरकती मागविण्यात आल्या होत्या.

दरम्यानच्या काळात काही ग्राहकांनी आपल्याकडील थकबाकी भरली आहे. संस्थेच्या दप्तरी शेती, व्यापारी, औद्योगिक अशा ग्राहकांची सुमारे दीड लाख सभासदांची नोंद आहे. मात्र सद्यस्थितीत ही संख्या अवघी 50 हजार इतकीच राहिली आहे. सुमारे 1 लाख ग्राहकांकडे संस्थेची थकबाकी आहे.

सन 2011 पासून संस्थेचे वीज वितरणाचे काम बंद आहे. मात्र न्यायालयीन कामकाज करण्यासाठी संस्था सुरू ठेवण्यात आली आहे. श्रीरामपूर व राहुरी या दोन तालुक्यांतील संपूर्ण गावे तसेच नेवासा, संगमनेर आणि राहाता या तीन तालुक्यांतील अशा सुमारे 185 गावांतील ग्राहक सभासदांचा संस्थेच्या कार्यक्षेत्रात समावेश होतो.

संस्थेच्या वीज वितरणाच्या परवान्याचा प्रश्न अधांतरी असून सन 2011 पासून संस्थेला संपूर्ण जाळ्यांचे भाडे महावितरणकडून अदा होत आहे. जानेवारी 2024 पर्यंतच ते मिळणार आहे. संस्था गेल्या 13 वर्षांपासून कागदावर चालू आहे. त्यासाठी रोजंदारीवर काही कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, आलेल्या हरकतीनंतर संस्थेच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com