
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
मुळा प्रवरा वीज सहकारी संस्थेच्या मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम सुरु झाल्याने निवडणुकीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी हा हरकतीचा कार्यक्रम घोषित केला आहे. श्रीरामपूर, राहुरी तालुक्यातील संपूर्ण गावे तसेच राहाता, संगमनेर आणि नेवासा तालुक्यातील काही गावे या संस्थेच्या कार्यक्षेत्रात मोडतात.
संस्थेच्या श्रीरामपूर येथील मुख्य कार्यालय आवारात प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. याबाबत हरकती स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 27 मार्च 2023 पर्यंत या हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. 6 एप्रिल 2023 पर्यंत आलेल्या हरकतीवर निर्णय देण्यात येणार आहे. यानंतर 11 एप्रिल 2023 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
श्रीरामपूर, राहुरी सह राहाता, नेवासा आणि संगमनेर तालुक्यातील काही गावांतील वीज ग्राहक मिळून शेतकरी व्यापारी अशा ग्राहकांची संख्या संस्थेच्या दप्तरी अंदाजे दीड लाखांच्या आसपास आहे. सद्यस्थितीत या संस्थेचे सुमारे एक लाख ग्राहक केवळ थकबाकी अभावी मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. संस्थेच्या विद्यमान संचालकांचा कार्यकाल हा सन 2021 पर्यंत होता. मात्र कोरोनामुळे राज्यभरातील इतर संस्थांबरोबरच याही संस्थेच्या निवडणुकीचा कार्यक्रम लांबणीवर पडला होता.
2011 ते अद्याप पावतो संस्था ही कागदोपत्री चालू आहे. खा. डॉ. सुजय विखे पाटील हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत. संस्थेच्या चालू असलेल्या न्यायालयीन लढाई संदर्भातील निवाडा होत नसल्यामुळे संस्था चालू होण्यासंदर्भात वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत.
संस्थेची गत पंचवार्षिक निवडणूक ही महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्रीरामपूर तालुक्यातून माजी आमदार भानुदास मुरकुटे, राहुरी तालुक्यातील प्रसाद तनपुरे यांच्याशी आघाडी करून बिनविरोध करण्यात आली होती. स्वर्गीय जयंत ससाणे हे विखे बरोबर होते.
सद्यस्थितीत राज्यभरापासून तर जिल्हा आणि तालुका पातळीपर्यंत असे सर्व दूर वेगवेगळ्या पक्षात फाटा फूट होऊन पूर्वी एकत्र असलेले नेते आता एकमेकांपासून दुरावले आहेत. दरम्यान, आताची निवडणूक ही बिनविरोध होते किंवा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पक्ष शिवाय शेतकरी संघटना आणि इतरही काही पक्षांच्या आघाड्या अशी होण्याची चिन्हे आहेत.