मुळा-प्रवराने ऑक्सिजन प्रकल्प उभारावा

संचालक संजय छल्लारे यांचे अध्यक्ष खा. सुजय विखे यांना साकडे
मुळा-प्रवराने ऑक्सिजन प्रकल्प उभारावा
File Photo

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन बेडची गरज भासत असताना रुग्णांना वेळेवर बेड उपलब्ध होत नाही. या पार्श्वभूमीवर मुळा-प्रवरा वीज सहकारी संस्थेने आपल्या कार्यक्षेत्रातील श्रीरामपूर व राहुरी तालुक्यात ऑक्सिजन प्रकल्प उभारावेत, अशी मागणी संस्थेचे संचालक संजय छल्लारे यांनी संस्थेचे अध्यक्ष खा. डॉ. सुजय विखे यांच्याकडे निवेदनाद्रारे केली आहे.

मुळा-प्रवरा संस्थेच्यावतीने नेहमीच सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले जातात. गेल्यावर्षी करोना काळात मुळा-प्रवरा संस्थेने कार्यक्षेत्रातील सभासदांसाठी अन्नछत्र सुरू केले होते. संस्थेचे अध्यक्ष खा. डॉ. सुजय विखे यांनी विळद घाट येथे ऑक्सिजन प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली आहे. तसेच शिर्डी येथे रिलायन्सच्यावतीने ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात येत आहे.

सध्या संस्थेच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकांना ऑक्सिजन बेडची गरज पडते. मात्र, ते सहजासहजी उपलब्ध होत नसल्याने काही रुग्णांना नगर, औरंगाबाद, पुणे अथवा नाशिक जिल्ह्यातील रुग्णालयात हलवावे लागते. यावेळी नातेवाईकांची मोठी दमछाक होते.

कार्यक्षेत्रातील श्रीरामपूर व राहुरी तालुक्यात ऑक्सिजन प्रकल्प उभारल्यास रुग्णांना आवश्यक असलेल्या ऑक्सिजनची कमतरता पूर्ण करता येईल. यासाठी संस्थेच्या जागेत शक्य नसल्यास संबंधित ग्रामीण रुग्णालय अथवा पालिका उपलब्ध करून देईल, त्या जागेत हे प्रकल्प उभारता येतील.

मुळा-प्रवरा संस्थेने सभासदांच्या हितावह पुढाकार घेऊन कार्यक्षेत्रातील श्रीरामपूर व राहुरी तालुक्यात विळद घाट व शिर्डीप्रमाणे ऑक्सिजन प्रकल्प उभारावे. यामुळे सभासदांना दिलासा मिळून करोना रुग्णांना वेळेत ऑक्सिजन उपलब्ध होऊन अनेक रुग्णांचे प्राण वाचतील, असे छल्लारे यांनी म्हटले आहे.

सध्या संस्था बंद असली तरी महावितरणकडून संस्थेला मालमत्ता वापरापोटी भाडे मिळते. त्यामुळे संस्था आर्थिकदृष्टीने सधन आहे. खा. डॉ. सुजय विखे यांनी विळद घाट येथे दहा दिवसात प्रकल्प उभारण्यात येईल, असे जाहीर केले. संस्थेचे दीड लाख सभासद आहेत. करोनाच्या कठीण काळात शासनाकडून मदत होतच आहे. मात्र, अनेक कारखान्यांनी मदतीसाठी पुढाकार घेतलेला दिसून येत नाही. अशावेळी सर्वपक्षीय संचालक असलेल्या संस्थेच्या माध्यमातून खा. विखे यांनी यासाठी पुढाकार घेऊन सभासदांना मदतीचा हातभार लावून सभासदांचे आशिर्वाद घ्यावेत, असेही छल्लारे यांनी म्हटले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com