मुळा धरणात नगरच्या तरूणाचा बुडून मृत्यू

मुळा धरणात नगरच्या तरूणाचा बुडून मृत्यू

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

मुळा धरणातील अथांग जलसागर व निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी आज (रविवारी) सुट्टीच्या दिवशी पर्यटकांनी गर्दी केली. परंतु, त्यांच्या आनंदावर विरजण पडले. आज दुपारी धरणाच्या पाण्यात उतरलेला नगर शहरातील एक पर्यटक बुडाला. स्थानिकांच्या मदतीने सायंकाळी साडेपाच वाजता मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.

चेतन कैलास क्षीरसागर (वय 38, रा. श्रमिकनगर, पाईपलाईन रोड, भिस्तबाग चौक, सावेडी, अहमदनगर) असे मृताचे नाव आहे. मृत चेतन समवेत त्याचे मित्र बाळकृष्ण धारुणकर, सोमनाथ देवकर, बाळासाहेब शिंदे, संतोष मेहत्रे, निलेश धारुणकर, बाळासाहेब जुंदरे, संदीप शिंदे, आशुतोष भागवत, राजेंद्र करपे, योगेश पतले, नितीन फल्ले, मिलिंद शिरसागर (सर्वजण रा. अहमदनगर) असा 13 जणांचा ग्रुप धरणावर पर्यटनासाठी आला होता

धरणाच्या प्रवेशद्वारावरील पोलीस चौकी जवळून आत जाण्यास पर्यटकांना बंदी आहे. त्यामुळे, जलसंपदाच्या कर्मचारी वसाहतीमधील रस्त्याने सर्वजण चमेली गेस्ट हाऊस जवळ गेले. गेस्ट हाऊस समोरील पटांगणात सर्वांनी आपल्या समवेत आणलेल्या भोजनाचा आस्वाद घेतला. सायंकाळी चार वाजता चमेली गेस्ट हाऊसच्या मागील बाजूस धरणाच्या पाण्यात पोहोण्यासाठी काहीजण उतरले होते.

या ठिकाणी प्रत्येक वर्षी पर्यटक बुडाल्याच्या घटना घडल्या आहेत. तेथील खोल पाण्यात उतरलेला चेतन क्षीरसागर दमछाक होऊन पाण्यात बुडाला. मित्रांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस नाईक गणेश सानप यांनी सायंकाळी साडेपाच वाजता स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com