मुळा धरणावर पाच कोटींचा सोलर प्रकल्प उभारणार- खा. विखे

बुर्‍हाणनगर योजनेतील 47 गावांना मोफत पाणी देण्याचा मानस
मुळा धरणावर पाच कोटींचा सोलर प्रकल्प उभारणार- खा. विखे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

तेलगंणा राज्याच्या धर्तीवर मुळा धरणाचा पाच कोटी रुपये खर्च करून प्रोटीन सोलर प्रकल्प उभारणार आहे. बुर्‍हाणनगर योजनेतील 47 गावांना होणारा वीज बिलाचा त्रास कमी करणार आहे. पुढील पन्नास वर्षे नगर तालुक्यातील या 47 गावांना पाण्यासाठी एक रुपया सुद्धा द्यावा लागणार नाही. या प्रकल्पाबाबत प्रस्ताव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी आ. शिवाजी कर्डिले यांच्या माध्यमातून दिला असल्याची माहिती खा. डॉ. सुजय विखे यांनी दिली.

वाकोडी (ता. नगर) जलजीवन मिशन कामाच्या उद्घाटन प्रंसगी ते बोलत होते. यावेळी खा. डॉ. विखे म्हणाले, आपले सरकार आल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस पालकमंत्री विखे पाटील, माजी आ. कर्डीले यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुक्यात विकासाचे नियोजन करत आहोत. सत्ता नसल्यामुळे 3 वर्षे कामे करू शकलो नाही. महाआघाडी सरकारने तीन वर्षांच्या काळात एक रुपयाचा निधी दिला नाही. सत्ता आल्यानंतर सर्वात जास्त निधी नगर तालुक्यात कर्डिले यांच्या माध्यमातून दिला आहे.

पारनेर मतदारसंघात केलेले काम सहा महिने सुद्धा टिकलेले नाहीत. सार्वजनिक बांधकाम विभागाने तीन वर्षांमध्ये झालेल्या कामाची पाहणी करावी. नगर तालुक्यात भूसंपादनासाठी 11 गावांत शेतकर्‍यांना 240 कोटी रुपये तीन महिन्यांत वाटप केले. नगर तालुक्यात पाच कोटी रुपयांचे महिला बालकल्याण भवन बांधणार आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातील महिलांना बचत गटांना रोजगाराच्या माध्यमातून प्रशिक्षण देणार आहे.

तीन वर्षापूर्वी जनतेने निवडून दिलेले सरकार येऊ शकले नाही. स्वार्थासाठी भाजप-सेना निवडून आलेले सरकार पाडण्याचे पाप सत्तेसाठी राष्ट्रवादीने केले. जिल्ह्यातील 300 मुलांना एमपीएससी, यूपीएससी स्पर्धा परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षण देणार आहे. यावेळी कर्डिले म्हणाले, जिल्हा परिषद, पंचायत समिती ताब्यात आल्यावर मोठ्या प्रमाणात विकास कामे होणार आहेत. यासाठी आत्तापासून सर्वांनी सज्ज रहावे. राज्यात आपले सरकार असल्यामुळे निधीची कमतरता भासणार नाही.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com