मुळा धरण गणेशोत्सवाच्या काळात ओव्हरफ्लो होण्याची शक्यता
सार्वमत

मुळा धरण गणेशोत्सवाच्या काळात ओव्हरफ्लो होण्याची शक्यता

दक्षिण नगर जिल्ह्याची जलदायिनी असलेल्या मुळा धरणाचा पाणीसाठा २१ टीएमसीवर पोहोचला

Nilesh Jadhav

राहुरी | प्रतिनिधी | Rahuri

दक्षिण नगर जिल्ह्याची जलदायिनी असलेल्या मुळा धरणा (mula dam) चा पाणीसाठा २१ टीएमसीवर पोहोचला असून मुळा धरण ८० टक्के भरले आहे. अलीकडच्या गेल्या वीस-बावीस वर्षांच्या काळात धरण ऑगस्टमध्ये भरण्याची शक्यता आहे.

गेल्या आठवड्यापासून पावसाने मुळा धरणाच्या लाभ क्षेत्रासह पाणलोट क्षेत्रात दमदार हजेरी लावली असून धरणाकडे कोतुळकडील मुळा नदीतून गेल्या आठ दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. आज सकाळी धरणाकडे लहीत खुर्द येथून सव्वा तीन मीटरला  नऊ हजार १५५ क्यूसेकने धरणाकडे पाणी वाहत होते. धरणात २४ तासात पाऊण टीएमसी पाणी जमा झाले आहे. पाण्याची पातळी १ हजार ८०३ फुटांवर पोहोचली. गेल्या आठ दिवसात पाणीसाठ्यात वाढ झाली असून या काळात धरण पाणी पातळीमध्ये साडेतेरा फुटांची वाढ झाली. यापूर्वी धरण विस-बावीस वर्षांत ऑगस्टमध्ये चार वेळा ओव्हरफ्लो झाले आहे. सन 2005, 2006, 2007 या तीन वर्ष ऑगस्टमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होऊन मुळा नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आला होता. 

मुळा धरणाकडे पाण्याची आवक पाहता साडे पंचवीस टीएमसी साठा झाल्यानंतर केव्हाही धरणातून मुळा नदी पात्रात पाणी सोडले जाऊ शकते. ऑगस्ट महिना संपायला अजून दहा दिवस बाकी आहे. उद्यापासून गणेशोत्सव सुरू होत आहे. धरणाची पाणलोट क्षेत्रात पाऊस पाहता गणेशोत्सव काळात मुळा धरण ओव्हरफ्लो होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या असून मुळा लाभक्षेत्रातील राहुरी, नगर, पाथर्डी, शेवगाव, नेवासा तालुक्यातील सर्वांचे तसेच गणेश भक्तांचे देखील लक्ष लागले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com