
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
मुळा धरणाच्या डाव्या कालव्याच्या 0 ते 17 किमी मधील 4 कोटी 54 लाख 67 हजार 494 रुपये खर्चाच्या विशेष दुरूस्ती प्रस्तावास आणि डाव्या कालव्याच्या अंतिम वितरीका 16/ 560 किमी मधील 1 कोटी 88 ला 44 हजार 207 रूपये एवढ्या खर्चाच्या विशेष दुरूस्ती प्रस्तावास अटींवर प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. याबाबतचे परिपत्रक जलसंपदा विभागाने जारी केले आहे. त्यामुळे डावा कालव्याच्या दुरूस्ती तसेच वितरीकेच्या दुरूस्तीचा मार्ग मोकळा होणार आहे.
मुळा नदीवर राहुरी तालुक्यात मुळा धरण 1974 मध्ये बांधण्यात आले. त्यानंतर उजव्या आणि डाव्या कालव्यांद्वारे शेतीसाठी पाणी देण्यात येत आहे. पण या कालव्यांवरील प्रमुख बांधकामाची मोठी दुरूस्ती करण्यात आलेली नाही. कालव्यांद्वारे तसेच वितरीकेद्वारे सिंचन करत असताना सदर बांधकामातून मोठ्या प्रमाणात गळती होत असून त्यामुळे वहनव्यय वाढून सिंचन व्यवस्थापन विस्कळीत होत आहे. त्यामुळे कालव्याची ही दुरूस्ती झाल्यास 2415 हेक्टर क्षेत्र पुनःर्स्थापित होणार आहे. या अनुषंगाने या प्रस्तावित अंदाजपत्रककास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तसेच वितरिकेची दुरूस्ती झाल्यास 2117 हेक्टर क्षेत्र पुनःर्स्थापित होणार आहे.