मुळा चारी पाणी प्रश्न पुन्हा ऐरणीवर

30 ते 35 गावे पाण्याच्या प्रतिक्षेत
मुळा चारी पाणी प्रश्न पुन्हा ऐरणीवर
File Photo

करंजी |वार्ताहर| Karanji

पाथर्डी तालुक्यातील मिरी, करंजी, चिचोंडी, शिराळ व इतर 35 गावांच्या हक्काचे चार टीएमसी पाणी मुळा धरणातून घोडेगाव, खतवाडी या दुष्काळी भागाला पूर्वनियोजित चारीद्वारे मिळावे अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. या प्रमुख मागणीसाठी सैनिक समाज पार्टीचे राष्ट्रीय नेते अ‍ॅड. शिवाजीराव डमाळे यांनी काही माजी सैनिकांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीक्षेत्र हरेश्वर देवस्थान येथे एक दिवसाचे मौन पाळून याबाबत जिल्हाधिकार्‍यांना पत्र दिल्याने डोंगराच्या कडेने येणार्‍या मुळा चारीच्या पाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मुळा धरणाचे बांधकाम 1970/71च्या दरम्यान झाले. तेव्हापासून घोडेगाव येथून मुख्य पाटामधून खतवाडीपासून पुढे वरील डोंगराळ भागासाठी चार टीएमसी पाणी देण्याचे नियोजित होते. तेव्हापासून अनेक नेत्यांनी चारीसाठी आंदोलने केली त्यानंतर खोटी आश्वासने मिळाली व उद्घाटनेही झाली. अनेक सरकारे आली आणि गेली चारी ऐवजी एक वांबोरी पाईपलाईन टाकून त्या परिसरातील शेतकर्‍यांची समजूत काढण्याचा केविलवाणा प्रयत्न त्यावेळी झाला. त्या पाईपलाईनद्वारे चार टीएमसी पाणी देण्याचे ठरले.

प्रत्यक्षात मात्र ठरल्याप्रमाणे लाभधारक शेतकर्‍यांना पाणी मिळालेच नाही. नेवासा तालुका मुळा धरणाच्या पाण्यामुळे समृद्ध झाला म्हणून तेथील शेतकरी सधन झाला परंतु वरील डोंगर भागातील कोल्हार, चिचोंडी, मिरी, शिराळ, करंजी परिसराला पाणी न मिळाल्यामुळे 30 ते 35 गावे आजही पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. शेतीला पाणी न मिळाल्यामुळे शेतकर्‍यांची मुले सैन्यात, पोलिस दलात भरती होऊन कशीतरी उपजीविका भागवत आहेत.

आता ‘जय जवान, जय किसान’ कमिटी स्थापन करून सैनिक समाज पार्टी या संदर्भात विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यासाठी पाठपुरावा करणार असून मुळा धरणापासुन पुढे घोडेगाव खतवाडी जुन्या चारीचे काम त्वरित सुरू करून पूर्णत्वास नेण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी सैनिक समाज पार्टीच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली असल्याची माहिती अ‍ॅड. डमाळे यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.