
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
मुळा लाभक्षेत्रातील शेतकर्यांची मागणी विचारात घेऊन खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या सूचनेवरून उजव्या कालव्यांना उन्हाळी आवर्तन सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला असून 1 मार्च ते 15 एप्रिलपर्यत या आवर्तनाचा कालावधी असणार आहे.
सध्या लाभक्षेत्रात शेतकर्यांनी ऊस, कांदा, गहू, मका, तसेच चारा पीकांची लागवड केली आहे. उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने पाण्याची पातळी घटत आहे. त्यामुळे मुळाचे उन्हाळी आवर्तन तातडीने सुरू करावे अशी मागणी शेतकर्यानी खा.डॉ. विखे पाटील यांची भेट घेवून केली होती. पाण्याची तीव्रता लक्षात घेवून विभागाने आवर्तनाचे नियोजन करावे आशा सूचना खा. विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांना दिल्या होत्या.
उन्हाळी आवर्तनाचे नियोजन विभागाने केले असून 1 मार्च ते 15 एप्रिल या कालावधीत करण्यात आले असून, लाभक्षेत्रातील अंदाजे 30 हजार हेक्टर क्षेत्राला या आवर्तनाचा लाभ होणार आहे. 45 दिवस हे आवर्तन सुरू राहाणार असल्याने राहुरी, नेवासा, शेवगाव, पाथर्डी या तालुक्यातील शेतकर्यांना दिलासा मिळणार आहे.