मुकुंदनगर, सर्जेपुराच्या बॅरिकेटिंगसाठी सव्वादोन लाख
सार्वमत

मुकुंदनगर, सर्जेपुराच्या बॅरिकेटिंगसाठी सव्वादोन लाख

आयुक्तांच्या अधिकारात वापर : स्थायीकडे अवलोकनार्थ

Arvind Arkhade

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने मुकुंदनगर, सर्जेपुरात बॅरिकेटिंग करण्यासाठी सव्वादोन लाख रुपये खर्च केले आहेत. आयुक्तांनी त्यांच्या अधिकारात हा खर्च आपत्कालीन व्यवस्थापनातून करण्यास मान्यता दिली असून हा खर्च अवलोकनार्थ स्थायी समितीकडे सादर करण्यात आला आहे.

पोलीस प्रशासनाच्या आदेशानुसार आयुक्तांनी हा खर्च केला. कामाची निकड पाहता टेंडरिंग करणे शक्य नव्हते. त्यामुळे नियमीत ठेकेदार असलेल्या श्रवण मंडप अ‍ॅण्ड लाईट डेकोरटर्स यांना बॅरिकेटिंगचे काम देण्यात आले. मुकुंदनगरमध्ये 30 मार्च ते 14 एप्रिल या काळात 302 रनिंग फूट बॅरिकेटस लावण्यात आले.

सर्जेपुरात 356 रनिंग फूट बॅरिकेटस 8 दिवस लावले होते. 55 रुपये रनिंग फूट दरानुसार ठेकेदाराने यापूर्वी महापलिकेचे काम केले होते. मात्र हे काम करताना दर थेट 15 रुपये रनिंग फुटावर आणण्यात आला आहे.

मुकुंदगरमधील 12 ठिकाणी 17 दिवसांकरिता 300 रनिंग फुटाचे 76 हजार 500, सर्जेपुरातील 17 ठिकाणी 356 रनिंग फुट 9 दिवसांचे 48 हजार, मुकुंदनगरमधील अंतर्गत रस्ते बंद करण्यासाठी 38 ठिकाणी 1 हजार 131 रनिंग फूट बॅरिकेटिंगचे 1 लाख 1 हजार असे 2 लाख 26 हजार 404 रुपये बॅरिकेटिंगवर खर्च झाला आहे. हा खर्च ठेकेदाराला तत्काळ अदा करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. खर्चाचा हा तपशील अवलोकनार्थ स्थायी समितीकडे पाठविण्यात आला आहे.

स्थायी समितीची शुक्रवारी सभा

स्थायी समितीची ऑनलाईन सभा शुक्रवारी (दि.7) दुपारी बारा वाजता होणार आहे. सभापती मुदस्सर शेख यांनी ही सभा झूम अ‍ॅपद्वारे आयोजित केली आहे. वॉर्ड नंबर, 9,11, 14 मधील विविध कामांसह इमारत दुरूस्तीची 50 लाखांची निविदा समितीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आली आहे. समितीसमोर 10 विषय ठेवण्यात आले आहेत. इमारत दुरूस्तीसाठी 50 लाख रुपयांच्या खर्चासाठी टेंडर मागविले होते. त्यात अनिल झेड कोठारी यांचे 0.99 बिलो तर सुनील राऊत यांचे एक टक्का जादा दराची निविदा आली आहे. यातील कोठारी यांची बिलो निविदा मंजूर करण्याची शिफारस प्रशासनाने स्थायी समितीकडे केली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com