मोहरम मिरवणूक मार्गावर 1100 पोलिसांचा बंदोबस्त

संवेदनशिल ठिकाणी बॅरिकेटींग || समाजकंटकांवर ‘वॉच’
Police | पोलिस
Police | पोलिस

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर आज (शुक्रवारी) रात्री निघणार्‍या कत्तलची रात्र मिरवणुकीसाठी व उद्या (शनिवारी) निघणार्‍या विसर्जन मिरवणुकीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 1100 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मिरवणुकीदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी ठीकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

मोहरम सणाला दि. 20 जुलैपासून प्रारंभ झाला असून आज (दि. 28) जुलै रोजी रात्री 12 वाजता कत्तलची रात्र मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर उद्या (दि. 29 जुलै रोजी) दुपारी 12 वाजता मोहरम उत्सव विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. मोहरम उत्सव शांततेत पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून अधीक्षक ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सुमारे 650 समाजकंटकांवर प्रतिबंधक कारवाई केली आहे. मिरवणुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोन तसेच व्हिडिओ शुटिंगच्या माध्यमातून चित्रीकरण करण्यात येणार आहे.

पोलीस अधीक्षक ओला यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक 1, पोलीस उपअधीक्षक 4, पोलीस निरीक्षक 24, सहा. निरीक्षक/उपनिरीक्षक 45, अंमलदार 645, आरसीबी 2 प्लाटून, सीआरपीएफ 1 कंपनी, होमगार्ड 250 असा बंदोबस्त असणार आहे.

105 ठिकाणी ‘सीसीटीव्ही’ची नजर

मिरवणूक मार्गावर 105 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मिरवणूक मार्गावर लाकडी व लोखंडी बॅरीकेटींग करण्यात येणार आहे. तसेच संवेदनशिल ठिकाणी बॅरिकेटींगचे आतून व बाहेरून बंदोबस्त नेमण्यात येणार आहे. मिरवणुकीच्या दुतर्फा गल्ली बोळातून समांतर गस्त, टॉवर बंदोबस्त, सवारी बंदोबस्त, सेक्टर बंदोबस्त, टेंभा बंदोबस्त, सरबतगाडी बंदोबस्त, मोबाईल गस्त व सेक्टर गस्त असा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com