गढूळ पाणी नगरकरांच्या माथी
महापालिका

गढूळ पाणी नगरकरांच्या माथी

महापालिकेने फोडलं पावसावर खापर

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

नगर शहराला होत असलेल्या गढूळ पाणी पुरवठ्याचे अजब कारण महापालिकेने शोधून काढले आहे. पावसाचे हौदात साठलेले पाणी तोट्या नसलेल्या नळातून पाईपलाईनमध्ये जाते. त्यामुळे नगरला गढूळ पाणी पुरवठा होत असल्याचा हा अजब शोध आहे. नळांना तोट्या बसवा नाहीतर महापालिका बसवेल अन् त्याचा खर्च वसुल करेल, असा फतवा महापालिकेने आज बुधवारी काढला आहे.

नगर शहराला गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे प्राप्त झाल्या आहेत. त्याचे कारण मात्र अजब आहे. पावसाचे वाहून जाणारे पाणी नागरिकांच्या उघड्या हौदात साठते. हौदात साठलेले पाणी तोट्या नसलेल्या नळातून महापालिकेच्या वितरण व्यवस्थेच्या पाईपलाईनमध्ये घुसते. तेच गढूळ पाणी पाणी वाटपाच्या वेळी नळातून येते असा अजब शोध महापालिकेने लावला आहे.

नागरिकांनी हौदावर झाकण बसवावे आणि नळांना तोट्या बसवाव्यात असा फतवा महापालिकेने काढला आहे. तोट्या न बसविल्यास महापालिकेमार्फत नळांना तोट्या बसविल्या जातील. त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल केला जाईल. याउपर दंडही केला जाईल असे प्रगटन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने जाहीर केले आहे.

वसंत टेकडी येथून नगर शहराला पाणी पुरवठा केला जातो. वसंत टेकडी येथील पाणी साठवण टाकीवर झाकण नाहीत. धरणातून आलेले पाणी ज्या ठिकाणी पडते तेही बंदिस्त नाही, असा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. तेथूनच नगरला गढूळ पाणी पुरवठा होतो, असे दाखविणारा हा व्हिडीओ आहे. मात्र महापालिका प्रशासनाने त्यावर भाष्य न करता नगरकरांच्या माथी खापर फोडण्याचा उफरटा फतवा काढला आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com