नगरमध्ये म्युकरमायकोसिसच्या इंजेक्शनचा तुटवडा

मनपाच्या बैठकीत शहरातील डॉक्टरांकडून इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची मागणी
नगरमध्ये म्युकरमायकोसिसच्या इंजेक्शनचा तुटवडा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

म्युकरमायकोसिस आजाराच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी महापालिका आरोग्य समिती व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नगर शहरातील कान, नाक, घसा तज्ञ व डेंटल सर्जन यांची संयुक्त बैठक गुरूवारी झाली. सध्या म्युकरमायकोसिस आजाराच्या उपचारासाठी आवश्यक इंजेक्शनची मोठ्या प्रमाणात गरज आहे. परंतु इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे तातडीने हे इंजेक्शन उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी शहरातील डॉक्टरांनी म्युकरमायकोसिस आजारासंदर्भात विविध उपाययोजना सुचविल्या. शहरात म्युकरमायकोसिसचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. त्यांना उपचारासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. करोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे म्युकरमायकोसिसचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळले. आता तज्ज्ञांच्या मते तिसरी लाट येणार असून लाटेमध्ये सर्वाधिक दुष्परिणाम लहान मुलांवर होणार आहेत. त्या लाटेचा संसर्ग देखील मोठ्या प्रमाणात होईल, असा तज्ञांचा अंदाज असून यासाठी नगर महापालिका उपाययोजना करण्यासाठी सज्ज असल्याचे प्रतिपादन नगरसेवक तथा आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉ. सागर बोरूडे यांनी केले.

यावेळी उपायुक्त यशवंत डांगे, समितीचे सदस्य सचिन जाधव, निखिल वारे, संजय ढोणे, सतीश शिंदे, नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे, बाळासाहेब पवार, मनपा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश राजूरकर, डॉ. गजानन काशीद, डॉ.धनंजय कुळकर्णी, डॉ. संजय आसनांनी, डॉ. योगेश बुधानी, डॉ.मंगेश जाधव, डॉ. राहुल आनंद, डॉ. विजयनाथ गुरुवाले आदी उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेमध्ये म्युकरमायकोसिस हा आजार करोनापेक्षा भयंकर असून जीवघेणा आहे. या आजाराचे रुग्ण राज्याच्या तुलनेत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. या आजार संदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे. नागरिकांनीही या आजाराचे लक्षण आढळल्यास तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधावा. करोनामधून बरे झालेल्या रुग्णांमध्ये ही लक्षणे मोठ्या प्रमाणात आढळत असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com