म्युकोरमायकॉसिसचा जिल्ह्यात पहिला बळी

मिरजगावमधील 35 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू नगरमध्ये 61 रुग्णांवर उपचार
म्युकोरमायकॉसिसचा जिल्ह्यात पहिला बळी

कर्जत/अहमदनगर |प्रतिनिधी| Karjat

म्युकोरमायकॉसिस आजाराच्या जिल्ह्यातील पहिल्या बळीची नोंद कर्जत तालुक्यात झाली आहे. मिरजगाव येथील 35 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पुंड यांनी या वृत्ताला पुष्टी दिली आहे.

करोना उपचारानंतर होणार्‍या म्युकोरमायकॉसिस या बुरशीजन्य आजाराचे जिल्ह्यात 61 रुग्ण असल्याची नोंद झाली आहे. या रुग्णांवर नगर शहरातील विविध खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी या माहितीला दुजोरा दिला. करोना संसर्गापाठोपाठ म्युकोरमायकॉसिस आजाराने जिल्ह्यात डोके वर काढले आहे. शहरातील विविध खाजगी रुग्णालयांकडून महापालिकेने म्युकोरमायकॉसिस आजारावर उपचार घेणार्‍यांची माहिती शनिवारी गोळा करण्यास सुरूवात केली.

त्यात खाजगी रुग्णालयांमध्ये सध्या 61 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे समोर आले. हे रुग्ण नेमके कोणत्या तालुक्यातील आहेत, याची माहिती महापालिकेचा आरोग्य विभाग घेत आहे. जिल्हा रुग्णालयाने महापालिकेकडे या आजारांवर उपचार घेणार्‍या रुग्णांची माहिती मागितली आहे. आजाराचा वाढता धोका लक्षात घेऊन राज्य व केंद्राकडे औषधांची मागणी केली जाणार आहे. हा आजार बरा होण्यासारखा आहे. प्राथमिक लक्षणे आढळताच त्यावर उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल होण्याचे आवाहन महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बोरगे यांनी केले आहे.

दरम्यान, म्युकोरमायकॉसिसचा जिल्ह्यातील पहिला बळी कर्जत तालुक्यामध्ये मिरजगाव परिसरामध्येेेे गेला आहे. मिरजगाव येथील एका 35 वर्षीय तरुणाचा या आजाराने मृत्यू झाला आहे. बळी गेलेल्या युवकाला काही दिवसांपूर्वी करोना संक्रमण झाले होते. यामधून तो बरा झाला. परंतु नंतर डोळे दुखत असल्यामुळे त्याची तपासणी केली असता त्याला म्युकोरमायकॉसिस झाल्याचे निष्पन्न झाले.

यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामध्ये त्याने डोळा गमावला. मात्र, त्यानंतर त्याच्या मेंदुला सुद्धा इन्फेक्शन झाले. डॉक्टरांनी मेंदूची देखील शस्त्रक्रिया केली होती. पण उपचार सुरू असतांना दुर्दैवाने बाधित युवकाचे निधन झाले. या युवकाच्या मागे आई, पत्नी, दोन लहान मुली, एक मुलगा असा परिवार आहे. दरम्यान, करोनाने थैमान घातलेले असतानाच आता करोनातून बरे झालेल्या रुग्णांसमोर म्युकोरमायकॉसिस आजाराचे संकट निर्माण झाले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com