संपकऱ्यांच्या मागण्यांना अण्णा हजारेंचा पाठिंबा

शिष्टमंडळाचा दावा । मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार
संपकऱ्यांच्या मागण्यांना अण्णा हजारेंचा पाठिंबा

अहमदनगर (प्रतिनिधी)

राज्यात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पाठिंबा दिल्याचा दावा कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलण्याची तयारीही हजारे यांनी दर्शविली असल्याचे या शिष्टमंडळाने म्हटले आहे.

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करून एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याची आंदोलकांची मागणी आहे. यासाठी काही दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी बंद पुकारला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने हजारे यांची राळेगण येथे भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले.

यावेळी हजारे म्हणाले, सरकार आणि आंदोलनकर्ते यांनी एकमेकांचा विचार केला पाहिजे. मात्र, ३८ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करूनही जर सरकारला जाग येत नसेल तर सरकारवर दबाव आणण्याशिवाय पर्याय नाही. कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन शांततेच्या आणि असंहिसेच्या मार्गाने केले पाहिजे, असे ते म्हणाले.

यावेळी एसटी कर्मचारी संघटनेचे आबा भोंडवे, सचिन थोरात, सुरेश औटी, गणेश चौधरी, मच्छिंद्र शिंदे, संदीप शिंदे, बापू शिंदे, अरुण मोकाते, नितीन सुरवसे, स्वरूपा वैद्य, कल्पना नगरे, सविता शिंदे उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com